Nagar News : “सफरचंद योग्य भाव लावून द्या” म्हणाल्याचा राग आल्याने कोयत्याने वार | पुढारी

Nagar News : "सफरचंद योग्य भाव लावून द्या" म्हणाल्याचा राग आल्याने कोयत्याने वार

श्रीगोंदा : पुढारी ऑनलाइन : सफरचंद बारीक आहेत, योग्य भाव लावून द्या असे म्हणाल्याचा राग आल्याने अतिक बागवान, अजहर बागवान,  जुबेर बागवान, (सर्व रा. श्रीगोंदा ता. श्रीगोंदा) या तिघांनी प्रेमदास उबाळे ( रा. आढळगाव )याच्या डोक्यात कोयत्याने वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वरील तिघा आरोपीविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना श्रीगोंदा शहरात काल रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

संबंधित बातम्या : 

याप्रकरणी किरण गव्हाणे (रा. आढळगाव)  यांनी फिर्याद दाखल केली आहे. किरण गव्हाणे व प्रेमदास उबाळे हे दोघे श्रीगोंदा येथे कामानिमित्त आले होते.रात्री पावणेनऊच्या सुमारास हे दोघे मांडवगण रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या वरील आरोपींच्या फळविक्री दुकानात गेले. तिथे सफरचंद कसे किलो आहेत असे विचारले असता आरोपी अतिक बागवान याने दोनशे रुपये किलो असे सांगितले. त्यावर फिर्यादी किरण गव्हाणे याने सफरचंद बारीक आहेत, योग्य भाव लावा असे म्हणाले. त्याचा राग आल्याने आरोपी अतिक बागवान याने अजहर आणि जुबेर बागवान यांना उद्देशून ‘या दोघांना जिवंत सोडू नका रे हे लई शहाणपण करतायेत’ असे म्हणून किरण गव्हाणे यास मारहाण करण्यास सुरुवात केली.

प्रेमदास उबाळे हा वाद सोडविण्यासाठी गेला असता आरोपी  जुबेर बागवान याने त्याचे हातातील नारळ फोडण्याच्या कोयत्याने आणि जीव ठार मारण्याच्या उद्देशाने त्यातील प्रेमदास उबाळे यांचे डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. आरोपी अजहर बागवान याने हाताने व लाथाबुक्याने मारहाण केली. तसेच अतिक बागवान याने फळे वाहण्याच्या क्रेटने  वरील दोघांना मारहाण केली. या मारहाणीत प्रेमदास उबाळे याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून त्याला नगर येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग यांनी फौजफाट्यासह भेट देत पाहणी केली.  वरील तिघा आरोपीविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न व इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून ,पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग करत आहेत.

Back to top button