कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेवर भाजपचाच महापौर; मंत्री चव्हाण यांचा विश्वास | पुढारी

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेवर भाजपचाच महापौर; मंत्री चव्हाण यांचा विश्वास

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : आगामी काळात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर केडीएमसीवर भाजपाचाच महापौर बसेल, असा विश्वास व्यक्त करत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी रविवारी कल्याणात बोलताना संकेत दिले. युतीच्या माध्यमातून ही निवडीची प्रक्रिया होईल. या सर्व प्रक्रियेत शिवसेनेला विश्वासात घेतले जाईल, असे ते म्हणाले.

रविवारी कल्याणमध्ये कल्याण जिल्हा भाजपातर्फे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची पत्रे वाटप आणि कार्यकारिणी निवडीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मंत्री चव्हाण माध्यमांशी बोलत होते. आगामी महापालिका आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने कार्यकारिणीत नव्याने तरुण चेहऱ्यांना संधी दिली आहे. येणाऱ्या सर्वच निवडणुका शिवसेना-भाजपा युतीच्या माध्यमातून लढविल्या जातील. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत हेच सूत्र वापरले जाईल. या निवडणुकीनंतर पालिकेवर भाजपाचा महापौर असेल, असा विश्वास मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या शब्दाला जागतील, असेही ते म्हणाले.

माकडे ज्या झाडावर असतात. ज्या झाडाला गोड फळे येतात. त्याच झाडावर दगडी मारल्या जातात. अशाच पध्दतीने आमदार गायकवाड यांनी भरपूर विकास कामे केली आहेत. ती काही जणांना सहन होत नाहीत. म्हणून ते आमदार गायकवाड यांना लक्ष्य करत आहेत. त्याकडे दुर्लक्ष करायचे असते, असा सल्ला मंत्री चव्हाण यांनी आमदार गायकवाड यांना दिला.

त्यांच्याकडे धनुष्यबाण, तर माझ्याकडे राॅकेट

आमदार गणपत गायकवाड यांनी या कार्यक्रमात शिवसेनेला लक्ष्य केले. त्यांच्याकडे धनुष्यबाण असले तरी माझ्याकडेही आता राॅकेट आहेत. तेही आता चांगले काम करुन बाणाला उत्तर देऊ शकतात. मला छेडण्याचा प्रयत्न केला तर मी जशास तसे उत्तर देईन. कल्याण पूर्व भागात आतापर्यंत 129 कोटींचा निधी मी आणला. त्या निधीतून इतर पक्षाची लोक स्वत:ची नावे लावून आपण निधी आणल्याची टिमकी वाजवत आहेत. आपण हा निधी शासनस्तरावरुन मंजूर करुन घेतला.

परंतु काही मंडळींनी या निधी आणि कामाचे श्रेय मला मिळू नये म्हणून प्रत्येक टेबलखाली दडवून ठेवला असल्याचा गौप्यस्फोट करून आमदार गायकवाड यांनी एकच खळबळ उडवून दिली. हाच निधी वेगळ्या माध्यमातून मुक्त करुन त्यांनी आणला आहे. तो सगळा हिशेब आपल्याकडे आहे. तो योग्यवेळी आपण बाहेर काढू, असाही इशारा आमदार गायकवाड यांनी शिवसेना नेत्यांना दिला.

शिवसेनेतील पदाधिकारी गुंडांना पोलिसांचा बंदोबस्त

कल्याण पूर्वेतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी आपण निधी मंजूर करुन आणला. आता त्या कामाचे श्रेय घेण्यासाठी नंतर वेगळेच लोक पुढे आले. एकदा का लोकसभेच्या निवडणुका झाल्या की मग मात्र मी यांच्या प्रत्येक आरोपाला सविस्तर उत्तर देईन, असा इशारा आमदार गायकवाड यांनी दिला. लोकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस असतात. पण कल्याणमध्ये शिवसेनेतील पदाधिकारी असलेल्या गुंडांना खासगी सुरक्षा, चार पोलिसांचा बंदोबस्त दिला जातो. तो बंदोबस्त काढाून घ्यावा म्हणून यासाठी आपण शासनाला पत्र दिली आहेत, असे गायकवाड म्हणाले.

सत्ताधारी मित्र पक्षावर डागली तोफ

आमदार गायकवाड यांच्या प्रत्येक बोलण्याचा रोख शिवसेनेचे खा. डाॅ. श्रीकांत शिंदे, त्यांचे खंदे समर्थक कल्याण पूर्वेचे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या दिशेने होता. गेल्या काही महिन्यांपासून महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगला आहे. रविवारी सभेच्या माध्यमातून आमदार गणपत गायकवाड यांनी सत्ताधारी मित्र पक्षावर चांगलीच तोफ डागल्याचे दिसून आले.

Back to top button