माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ताकद दिली तरच तालुक्याचा विकास : गोकुळ दौंड | पुढारी

माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ताकद दिली तरच तालुक्याचा विकास : गोकुळ दौंड

संदीप रोडे

नगरसह राज्यात एकीकडे दहीहंडीचा काला सुरू असताना दुसरीकडेे पाथर्डीत ‘दोन घराण्यांनीच तालुक्याची सत्ता भोगली. जनता पाण्यावाचून तडफडत आहे, आमची मुलं आजही पाचरटातच आहेत. तुमचा विकास कोण करणार, कधी करणार?, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ताकद दिली तरच तालुक्याचा विकास होईल’ अशी ‘गोकुळ’वाणी झाली. जातीपातीच्या राजकारणात दोनच घराण्यांनी पोळी भाजली, असे टीकास्त्र सोडले. अर्थात त्यांचा निशाणा राजळे आणि ढाकणे कुटुंबांकडे होता, हे सांगणे न लगे. गोकुळ दौंड यांच्या रोखठोक भूमिकेने पाथर्डी-शेवगावच्या आमदार मोनिका राजळे आणि अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांच्या राजकारणाची कहाणीही या निमित्ताने समोर आली. आ. राजळे आणि त्यांच्यावर तोफ डागणारे दौंड हे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत, हे विशेष. आता दौंड यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजळे वहिनींवर कोण निशाणा साधतंय, की हे पक्षांतर्गत बंडाळीचे संकेत आहेत, हे समजायला अजून काही दिवस तरी थांबावे लागेल.

2009 पर्यंत शेवगावातील 32 गावांसह संपूर्ण पाथर्डी तालुका असा स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ होता. पुढे पुनर्रचनेत संपूर्ण शेवगाव तालुका व पाथर्डीतील साडेतीन महसूल मंडलांसह नव्याने मतदारसंघ अस्तित्वात आला. चंद्रशेखर घुले हे पुनर्रचनेनंतर पहिले राष्ट्रवादीचे आमदार झाले. 2014 च्या विधानसभेला राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद उपाध्यक्ष असलेल्या मोनिका राजळे यांनी भाजपच्या तिकिटावर आमदारकी मिळविली. 2019ला पक्षांतर्गत बंडाळी झाल्यानंतरही भाजपने टाकलेला विश्वास अन् सहानुभूतीवर त्या दुसर्‍यांदा आमदार झाल्या. आता विधानसभेची निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपलेली असताना गोकुळ दौंड यांचे बोल पाहता ते विधानसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याचे संकेत मानले जातात. राष्ट्रवादीकडून अ‍ॅड. प्रताप ढाकणे अगोदरच तयारीला लागले आहेत. तीन हजार घरांना प्रत्यक्ष भेट देत त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केलीय.

मोनिका राजळे या भाजपकडून हॅट्ट्रिक करण्याच्या तयारीत आहेत. अशातच राजळे यांना पक्षातूनच आव्हान दिल्यामागे बोलविता धनी कोण? असा प्रश्न अनेकांना पडलाय. गणपतराव म्हस्के, दगडू बडे यांचा अपवाद वगळता पाथर्डीची सत्ता राजळे-ढाकणे यांच्याभोवतीच फिरल्याचे दिसते. आप्पासाहेब राजळे, स्व. राजीव राजळे आणि मोनिका राजळे या तिघांनी पाच टर्म पाथर्डीचे प्रतिनिधित्व केलेय. बबनराव ढाकणे तीनदा आमदार राहिले होते. काँग्रेसचे विद्यमान आमदार असतानाही राजीव राजळे यांचे 2009च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट कापले गेल्याचा इतिहास आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलेल्या या मतदारसंघात चंद्रशेखर घुले यांना त्या वेळी उमेदवारी मिळाली होती. नाराज राजळे यांनी बंड करत अपक्ष उमेदवारी केली, तर भाजपकडून प्रताप ढाकणे मैदानात होते.

ढाकणे-राजळे यांचा पराभव करत घुले आमदार झाले. राजीव राजळे विद्यमान आमदार असतानाही त्याचा विचार न करता त्यांना डावलले गेल्याचा इतिहास पाहता गोकुळ दौंड यांच्या आकाशवाणीला महत्त्व प्राप्त होते. गल्लीपासून दिल्लीपर्यंत असलेल्या भाजप सत्तेचा पुरेपूर फायदा मोनिका राजळे यांनी करून घेत भक्कमपणे पाय रोवले हे खरं. मात्र, आजही पूर्व भागातील पाणीप्रश्न, ताजनापूर पाणी योजना, कल्याण-विशाखापट्टणम महामार्गाचे प्रश्न आहेतच. 1985 च्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे लढलेले आप्पासाहेब राजळे यांचा जनता पक्षाचे उमेदवार असलेले बबनराव ढाकणे यांनी पराभव केल्याचाही इतिहास आहे. पुढे 1990ला बाबूराव भापसे, रामनाथ गोल्हार यांचा पराभव करत आप्पासाहेब राजळे आमदार झाले. 1995 ला भाजपचा पराभव करत राजळे यांनी काँग्रेसचा गड राखला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून बबनराव ढाकणे 1999 च्या निवडणुकीत उतरले.

स्व. गोपीनाथ मुंडे यांनी भाजपकडून दगडू बडे हा नवखा चेहरा समोर आणला. काँग्रेसकडून राजीव राजळे तर अपक्ष चंद्रकांत म्हस्के अशी लढत झाली. या निवडणुकीत पाथर्डीत पहिल्यादांच भाजपने खाते उघडले. 2004 च्या निवडणुकीत भाजपने बडे यांचा पत्ता कट करत अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांना उमेदवारी दिली. त्या वेळी काँग्रेसचे राजीव राजळे यांनी ढाकणे यांचा पराभव करत पाथर्डी पुन्हा काँग्रेसकडे खेचून आणली होती. 2009 च्या निवडणुकीत भाजपने पुन्हा प्रताप ढाकणे यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत तिकिट डावलल्याने राजीव राजळे अपक्ष तर चंद्रशेखर घुले हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. तिरंगी लढतीत घुलेंनी विजयी गुलाल घेतला होता. 2014 च्या विधानसभेला मोनिका राजळे यांनी भाजपची उमेदवारी मिळविली. चंद्रशेखर घुले व मोनिका राजळे यांच्यातील सरळ लढतीत राजळे विजयी झाल्या.

भाजपकडून उमेदवारी मिळवताना राजळे यांना हर्षदा काकडे, अमोल गर्जे, मोहनराव पालवे यांच्याशी संघर्ष करावा लागल्याचा भूतकाळ आजही अनेकांना आठवतो. 2019 ला घुले यांनी उमेदवारीला नकार दिल्यानंतर राष्ट्रवादीने प्रताप ढाकणे यांना पुढे केले. मात्र मोनिका राजळे यांनी दुसर्‍यांदा बाजी मारत ढाकणेंचा पराभव केला. तीनदा हुलकावणी बसलेले प्रतापकाका हे राजळेंच्या पराभवासाठी प्रयत्नांची पराकष्टा करत आहेत. अशातच राजळे या हॅट्ट्रिक करण्याच्या तयारीत असताना दौंड सरसावले आहेत.

पाथर्डी मतदारसंघाचे राजकारण नेहमीच जातीपातीभोवती फिरल्याचे आजवर दिसते. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा पाथर्डीवर प्रभाव आजही आहे. भाजपची सत्ता असूनही राज्याच्या राजकारणात स्थान न मिळालेल्या पंकजा मुंडे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सलोखा ठेवताना आ. राजळे यांना दुहेरी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. 2019 च्या लोकसभेला भाजप उमेदवार सुजय विखे पाटील यांना सर्वाधिक मताधिक्य दिले ते पाथर्डीनेच. तेव्हापासून विखे पाटील-राजळे कुटुंबीयांचे सूर जुळले ते आजपर्यंत. असे असतानाही गोकुळ दौंड यांनी स्वपक्षाच्याच आमदाराच्या विरुद्ध केलेली गर्जना पाथर्डीतच नव्हे, तर जिल्ह्यातही चर्चेचा विषय ठरली नसती तरच नवल होते. अपेक्षेप्रमाणे लोक दौंड यांचा बोलविता धनी कोण, असा थेट प्रश्न विचारत आहेत.

दौंड यांच्या इच्छेचे (राज)कारण काय?
गोकुळ दौंड हे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष असले तरी राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्याशी त्यांची घट्ट मैत्री. दौंड यांच्यासाठी जिल्हा परिषदेच्या आंदोलनाप्रसंगी आ. लंके धावून आले ते मैत्रीखातरच. दौंड यांना नेहमीच लंके यांच्यासोबत अनेकांनी पाहिले. लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा, इच्छा प्रदर्शित करण्याचा अधिकार असला तरी दौंड यांच्या इच्छेमागे राज‘कारण’ काय?, त्यांना पुढे करत राजळेंसमोर अडचणींचा डोंगर कोण उभा करू पाहतोय? या प्रश्नांची उत्तरे स्वतः राजळे यांच्यासह लोकांनाही हवीच आहेत.

‘2024’ ः राजळे यांच्यासाठी अवघड पेपर
नगर जिल्ह्यात ‘सोधा’ नावाच्या पक्षाची मोठी शक्ती आहे. राजळे या त्याच पक्षाच्या पाईक. त्यांचे नंदई शंकरराव गडाख हे उद्धव ठाकरेंच्या सेनेसोबत आहेत. मामेसासरे आ. बाळासाहेब थोरात काँग्रेसचे. मोनिका राजळेंच्या मतदारसंघावर प्रभाव असलेले माजी आ. चंद्रशेखर घुले हे शंकरराव गडाखांचे व्याही. घुले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची घेतलेली भेट पाहता ते त्यांच्यासोबत राजकीय वाटचाल करतील. राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सत्ता पाहता घुले यांचे पाठबळ राजळे यांना मिळण्याचे संकेत आहेत. राजळेंचे राजकीय प्रतिस्पर्धी प्रताप ढाकणे यांच्याकडे राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जाते. मात्र ‘सोधा’सोबतच मुंडेंशी असलेले सलोख्याचे नाते राजळेंना उपयोगी ठरण्याचीच शक्यता अधिक. तरीही पक्षांतर्गत बंडाळी झालीच तर राजळे यांच्यासाठी ‘2024’चा पेपर तितका सोपा नसेल हे नक्की!

Back to top button