संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री शिंदे लोणीत येणार | पुढारी

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री शिंदे लोणीत येणार

लोणी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 123 व्या जयंती दिनानिमित्त राज्यस्तरीय साहित्य व कलागौरव पुरस्कार वितरण सोहळा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा होणार असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे पा. यांनी दिली. दरम्यान, यावेळी नियोजित 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रविंद्र शोभणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या समारंभास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पा. यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधुन दरवर्षी साहित्य व कलागौरव पुरस्काराचे वितरण करण्यात येते. प्रवरानगर येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहासमोरील प्रांगणात गुरुवार (दि.31) ऑगस्ट रोजी दु. 1 वा. होणार्‍या साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात यंदा सोलापूर जिल्ह्यातील डॉ. निशिकांत ठकार यांना पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पा. राज्यस्तरीय साहित्य सेवा जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. डॉ. शैलजा बापट यांना यंदाचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पा. राज्यस्तरीय उत्कृष्ठ साहित्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. विशेष साहित्य पुरस्कार विश्वास वसेकर यांच्या कविता संग्रहास दिला जाणार आहे.

यंदाचा राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार कलेच्या सेवेबद्दल वसंत अवसरीकर, समाज प्रबोधन पुरस्कार समाज प्रबोधन पत्रिका ( अशोक चौसाळकर) यांना तर नाट्यसेवेबद्दल पुरस्कार जळगाव येथील शंभू पाटील यांना देण्यात येणार आहे. डॉ. विखे पा. अ.नगर जिल्हा साहित्य पुरस्कार श्रीरामपूर येथील डॉ. शिरीष लांडगे यांच्या ज्ञानेश्वर दर्शन या ग्रंथास तर अ.नगर जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार विकास पवार यांच्या भंडारदरा धरण शतकपुर्ती प्रवास या पुस्तकास देण्यात येणार आहे. प्रवरा परिसर साहित्य पुरस्कार कोल्हार येथील डॉ. अशोक शिंदे यांच्या कविता संग्रहास देण्यात येणार असल्याचे खा. डॉ. विखे पा. म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यंदा प्रथमच पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. पद्मश्री डॉ. विखे पा. यांचा जयंती दिन ‘शेतकरी दिन’ म्हणून राज्यात साजरा केला जात असल्याने यंदा पुरस्कार वितरण सोहळ्यास मुख्यमंत्र्यांची उपस्थिती महत्वपूर्ण ठरणार असल्याचे खा. डॉ. विखे पा. म्हणाले. प्रवरानगर येथे सोहळ्याची जय्यत तयारी प्रवरा परिवाराने केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह प्रथमच जिल्ह्यात येत असल्याने त्यांच्या स्वागताचे नियोजन केले आहे.

97 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रविंद्र शोभणे यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. पालक मंत्री राधाकृष्ण विखे पा., माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पा., प्रवरा अभिमतचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पा., पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे, जि. प. माजी अध्यक्षा शालिनीताई विखे व साहित्यप्रेमी यावेळी उपस्थित राहणार असल्याचे खा. डॉ. सुजय विखे पा. यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा

गणेशोत्सवात रात्री 12 पर्यंत मेट्रो सुरू राहणार : उपमुख्यमंत्री अजित पवार 

नेवाशात चोरलेली बोअरची गाडी थेट तामिळनाडूतुन ताब्यात

सांगली : खानापुरातून निवडणूक लढण्याबाबत येणारा काळच ठरवेल : डॉ. जितेश कदम

Back to top button