सांगली : खानापुरातून निवडणूक लढण्याबाबत येणारा काळच ठरवेल : डॉ. जितेश कदम | पुढारी

सांगली : खानापुरातून निवडणूक लढण्याबाबत येणारा काळच ठरवेल : डॉ. जितेश कदम

विटा; पुढारी वृत्तसेवा : खानापूर मतदारसंघातून निवडणूक लढण्याबाबत येणारा काळच ठरवेल, असे सूचक विधान माजी मंत्री विश्वजीत कदम यांचे बंधू आणि सांगली जिल्हा काँग्रेसचे नेते डॉ. जितेश कदम यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील आळसंद (ता. खानापूर) येथे एका कार्यक्रमासाठी डॉ. कदम आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या राष्ट्रसेवा दलाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा विट्यात झाला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी डॉ. जितेश कदम यांनी खानापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी मागणी केली. याबाबत त्यांनी त्यावेळी स्पष्टपणे उत्तर दिले नव्हते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये थोडा संभ्रम होता. याबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, पूर्वी कडेगाव हा खानापूर तालुक्यात समाविष्ट होता. अलीकडे तो स्वतंत्र झाला आहे. त्यामुळे माजी मंत्री पतंगराव कदम आणि ज्येष्ठ नेते आमदार मोहनराव कदम यांच्यावर निष्ठा असलेले अनेक कार्यकर्ते इथे आहेत. खानापूर तालुका कदम कुटुंबियांना मानणारा आहे. त्यामुळे आपण खानापूर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी करावी, अशी कार्यकत्यांची मागणी आहे. तो त्यांचा अधिकार आहे, त्याबद्दल दुमत नाही. परंतु विधानसभेपूर्वी लोकसभेच्या निवडणूका आहेत. त्यामुळे अद्याप बराच वेळ आहे. मी खानापूर मतदारसंघातून निवडणूक लढणार की नाही याबाबत येणारा काळच ठरवेल, असे डॉ. कदम यांनी म्हटले आहे.

दरम्यान, कार्यक्रमात भाषण सुरू असताना पावसाची सर आली, त्यावर जितेश कदम यांनी चार वर्षांपूर्वी साताऱ्यात झालेल्या शरद पवार यांच्या पावसात झालेल्या सभेचा आणि झालेल्या सत्तांतराचा दाखला देत, पावसात सभा झाली की ती गाजतेच, असे वक्तव्य केले.

हेही वाचा : 

Back to top button