शेवगाव : अन् वाढला कर्मचार्‍याचा रक्तदाब! | पुढारी

शेवगाव : अन् वाढला कर्मचार्‍याचा रक्तदाब!

शेवगाव तालुका(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : शेवगाव नगरपरिषद कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांच्यात वेतनावरून सोमवारी हमरीतुमरी झाली. अधिकार्‍याच्या दबावामुळे या कर्मचार्‍याचा रक्तदाब वाढला. त्यामुळे कार्यालयात एकच गोंधळ उडाल्याचे दिसून आले. येथील नगरपरिषद कार्यालयातील काही कर्मचार्‍यांचे दोन-तीन महिने वेतन थकविले जाते. वेतनाअभावी कर्मचार्‍यांची उपासमार होत असल्याने, वेळेवर वेतन मिळावे, अशी त्यांची मागणी आहे.

मात्र, ती पूर्ण होत नसल्याने कर्मचार्‍यांचा चिडचिडेपणा वाढत आहे. त्यांच्याकडून मुख्याधिकारी यांच्याकडे सतत वेतनाची मागणी केली जाते. मात्र, काही कारणास्तव संबंधित अधिकारी याकडे वेळेवर लक्ष देत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यावरून एखाद्या संतप्त कर्मचार्‍याने अधिकार्‍यास जाब विचारल्यास, त्याचे समाधान होईल, अशी माहिती देण्याएूवजी त्यास वेगळी वागणूक देण्याचा प्रयत्न होतो.

अशाच प्रकारे नगरपरिषद कार्यालयातील एका वसुली लिपिकाने सोमवारी सकाळी 11 च्या दरम्यान मुख्याधिकारी यांना दोन महिन्यांच्या वेतनाबाबत जाब विचारला असता, त्यास अपमानास्पद वागणूक देण्याचा प्रयत्न झाला. त्यातुन कार्यालयातच कर्मचारी-अधिकारी यांच्यात हमरीतुमरी झाली आणि या प्रकाराने सदर कर्मचार्‍याचा रक्तदाब वाढला. मोठमोठ्याने आवाज येत असल्याने सर्व कर्मचारी काय प्रकार घडला, हे पाहण्यास धावले. त्यावेळी या कर्मचार्‍यास जोराची धाप लागली होती. नंतर सर्वांनी त्यास शांत करण्याचा प्रयत्न केला. कालांतराने त्याचा रक्तदाब पूर्ववत झाला.

ही घटना मुख्याधिकारी यांच्या दालनासमोर घडली. मात्र, सदर ते दालनात असतानाही त्यांनी बाहेर येण्याची तसदी घेतली नाही हे विशेष. या प्रकाराने काही कर्मचारी मनातल्या मनात संताप व्यक्त करीत होते. यापूर्वी वेळेवर वेतन मिळत नसल्याने अनेकवेळेस कर्मचार्‍यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.

हेही वाचा

श्रीगोंदा : कार-टॅ्रक्टर अपघातात चालकाचा मृत्यू

कुकाणा : हॉटेल व्यवस्थापकाला मारहाण

राजकीय फुटीचे काय घेवून बसलाय? इथे तर संपूर्ण बेट फुटीच्‍या उंबरठ्यावर!

Back to top button