

कुकाणा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : ड्राय डे असताना हॉटेलमधून दारुचे पार्सल देण्यास नकार दिल्याबद्दल हॉटेल व्यवस्थापकाला चौघांनी दगडाने मारहाण करून खिशातील दोन हजार रुपये काढून घेतल्याची घटना कुकाणा-भेंडा रस्त्यावरील हॉटेल यशदीप येथे घडली.याबाबत नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली. एक जण फरार झाला. याबाबत कुकाणा येथील हॉटेल यशदीपचे व्यवस्थापक प्रदीप रोहीदास रंधे यांनी नेवासा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादीत म्हटले की, 29 जून रोजी ड्राय डे असल्यामुळे परमिट रुम बंद होते. त्यामुळे हॉटेल बंद करुन झोपलो असतांना परमीट रुमचा पाठीमागील दरवाजा उघडून आरोपी जुनेद सत्तार शेख (रा.देवगाव), सोमनाथ गंगाधर खोसे (रा.जेऊर हैबती), दत्तात्रय सुगंधा वाल्हेकर (रा.देवगाव) व अन्य एकजण अशा चौघांनी मागील दरवाजाने हॉटेलात प्रवेश करून दारु मागितली.
त्यावर व्यवस्थापक रंधे यांनी दारू देण्यास नकार दिला. त्यामु'े संतप्त झालेल्या चौघांनी व्यवस्थापकाला दगडाने मारहाण करून खिशातील दोन हजार रुपये काढून घेतले.पोलिसांनी आरोपी जुनेद सत्तार शेख (देवगाव), सोमनाथ गंगाधर खोसे (जेऊर हैबती), दत्तात्रय सुगंधा वाल्हेकर (देवगाव) या तिघांना अटक केली.पोलिसांनी आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता, त्यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.