नगर : समांतर पुलाचे काम कधी सुरू होणार? कोल्हारच्या संतप्त ग्रामस्थांचा प्रशासनास सवाल | पुढारी

नगर : समांतर पुलाचे काम कधी सुरू होणार? कोल्हारच्या संतप्त ग्रामस्थांचा प्रशासनास सवाल

कोल्हार : पुढारी वृत्तसेवा :  नगर -मनमाड राज्य मार्गाला जोडणारा महत्त्वाचा प्रवरा नदीवरील जुना समांतर पूल मागील वर्षी एप्रिल महिन्यात पाडण्यात आला, परंतु वर्ष उलटले तरी अद्याप नवीन समांतर पुल न बांधल्याने वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे.
सतत अवजड व इतर वाहतुकीच्या वर्दळीमुळे समांतर पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. ते दुरुस्त करण्याचे काम अनेक वेळा करावे लागते. वाहतुकीच्या वाढत्या वर्दळीमुळे छोटे-मोठे अपघात पुलावर झाले. यामुळे अनेक वेळा वाहतूक कोंडी झाली आहे.

जुना पूल तोडल्यानंतर या जागेवर तातडीने नवीन समांतर पूल बांधण्याचे काम सुरू होणार, असे तत्कालीन प्रकल्पाधिकारी राजाराम येवले यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले होते, परंतु पूल तोडून वर्ष उलटले. यानंतर पुलाच्या बांधकामाबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. प्रकल्पाधिकारी येवलेंची बदली झाली. पूल पाडलेल्या अवस्थेत जैसे -थे उभा दिसत आहे. यामुळे सध्या एकाच पुलावरून सध्या वाहतुकीची वर्दळ सुरू आहे. वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन समांतर पूल बांधला नाही तर सध्या वाहतुकीस कार्यरत पूल देखील भविष्यात कमकुवत होण्याची शक्यता आहे. जोपर्यंत नवीन समांतर पुलाचे बांधकाम सुरू होत नाही, तोपर्यंत अधिकार्‍यांनी या पुलाच्या दागडूजीसह देखभाल सातत्याने लक्ष ठेवून करावी. पूल वाहतुकीसाठी भक्कमपणे कार्यरत राहिल, याची दक्षता घ्यावी. प्रवरा नदीवरील दुसर्‍या नवीन समांतर पुलाचे बांधकाम लवकर सुरू करावे, अशी मागणी कोल्हार भगवतीपुरचे नागरिक करीत आहेत.

 तब्बल 40 वर्षे खंबीर उभा असलेला समांतर पुल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने पाडला. पूल तोडल्यापासून शेजारच्या नवीन समांतर पुलावरून सध्या वाहतूक सुरू आहे, परंतु नगर- मनमाड राज्य मार्गावरून होणार्‍या अवजड व इतर वाहनांची संख्या वाढल्याच्या पार्श्वभूमीवर नवीन समांतर वाहतुकीस कमी पडत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे वारंवार होणार्‍या वाहतुक कोंडीला कोल्हारकरांना सामोरे जावे लागते.

हे ही  वाचा : 

जगाच्या तुलनेत भारतीय पाच तास अधिक ऐकतात गाणी

मुंबई : जुहू कोळीवाडा समुद्रात बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह सापडले

Back to top button