जगाच्या तुलनेत भारतीय पाच तास अधिक ऐकतात गाणी | पुढारी

जगाच्या तुलनेत भारतीय पाच तास अधिक ऐकतात गाणी

नवी दिल्ली : संगीत ही केवळ एक कला नसून, त्यापलीकडेही काही तरी त्यामध्ये निश्चितच आहे. भारतात नादब्रह्माची उपासना प्राचीन काळापासूनच होत आलेली आहे. खरे तर भारतीय अभिजात संगीताचा उगमच सामवेदापासून झालेला आहे. अर्थातच, भारतीयांना संगीत कलेची आवड प्राचीन काळापासूनच आहे. आजही संगीत, गाणी ऐकणारे अनेक लोक आपल्या देशात पाहायला मिळतील. जगाचा विचार केला तर अन्य देशातील लोकांच्या तुलनेत भारतीय लोक सरासरी पाच तास अधिक गाणी ऐकतात, असे एका नव्या पाहणीतून दिसून आले आहे.

आपण भारतीय लोक दर आठवड्याला सरासरी 25.7 तास गाणी ऐकतो. जगातील ही सरासरी वीस तासांची आहे. याचा अर्थ जगाच्या तुलनेत आपण दर आठवड्याला पाच तास अधिक वेळ गाणी ऐकण्यासाठी देत असतो. देशातील 63 टक्के आणि जगातील 69 टक्के लोक मानतात की, गाणी ऐकल्याने मानसिक आरोग्य चांगले राहते.

70 टक्के लोकांनी म्हटले आहे की, ते व्यायाम करीत असताना गाणी ऐकतात. त्यापैकी 88 टक्के लोक रनिंगवेळी, 83 टक्के लोक योगासने करीत असताना आणि 73 टक्के लोक सायकलिंग करीत असताना गाणी ऐकतात. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फोनोग्राफिक इंडस्ट्रीने भारत-चीनसह 22 देशांमधील 34 हजार लोकांची पाहणी करून ‘एंगेजिंग विथ म्युझिक’ नावाचा हा रिपोर्ट बनवला आहे. त्यानुसार 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये जगातील म्युझिक इंडस्ट्री 8 टक्के आणि भारताची 13 टक्क्यांनी वाढू शकते.

Back to top button