नगर : देवदर्शनाहून घरी परतणाऱ्या भक्तांवर काळाचा घाला ! कार अपघातात चार जणांचा मृत्यू | पुढारी

नगर : देवदर्शनाहून घरी परतणाऱ्या भक्तांवर काळाचा घाला ! कार अपघातात चार जणांचा मृत्यू

नेवासा फाटा (नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  इंदौर येथील शनिभक्त देवदर्शन करून परतीच्या प्रवासावर निघालेले असताना काळाने दुर्दैवी घाला घातला. नगर – संभाजीनगर महामार्गावरील नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरेबा येथे झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार तर अन्य दोन जण जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. रविवारी दुपारी 11 वाजता कार (एमएच 14 सीएस 9007) ही नगरकडून संभाजीनगरच्या दिशेने जात होती. मात्र, अचानक काही समजण्याच्या आत रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकाला धडकून समोरून चाललेल्या टेम्पोला (एमएच 48 टी 5319) जाऊन धडकली. हा टेम्पो संभाजीनगरहून नगरकडे जात होता. दुभाजक ओलांडून टेम्पोला धडकल्याने कार जागेवर पलटली. या भीषण अपघात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघे जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तर मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. जखमींना नगरच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

अपघातस्थळी शनिशिंगणापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक रामचंद्र कर्पे यांनी भेट देऊन जखमींसह मृतांना नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. काही काळ ठप्प झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली. अपघातात अभिलाष प्रमोदकुमार मंडलेचा (वय 25, रा. महालक्ष्मी हिवरा, नेवासा), योगेश परमेश्वर शर्मा (वय 24, रा. उंडेरी, ता. सरदारपूरा, मध्यप्रदेश), राहुल परमेश्वर शर्मा (वय 28, रा.उंडेरी, ता. सरदारपूरा, मध्यप्रदेश) व हर्ष मनोहर शर्मा (वय 18, रा. उंडेरी, ता. सरदारपूरा, मध्यप्रदेश), अशी त्यांची नावे आहेत. एक जण अभिलाष मंडलेचा हे नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवारा येथील राहणार असून, ते मयत शर्मा यांचे मित्र आहेत. तसेच, अभिलाष, योगेश व राहुल हे तिघेही ‘सीए’ असून, सर्व जण एका खासगी कंपनीत प्रॅक्टिस करत होते. तर, राहुल व योगेश सख्खे भाऊ असून, राहुल यांची पत्नी जखमी आहे, त्यांचे नाव समजू शकलेले नाही. तर, हर्ष हा राहुल यांचा मेहुणा आहे. दरम्यान आमदार शंकरराव गडाख यांनी नेवासा फाटा व नगर येथे रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्‍यांच्याशी संपर्क साधून मदतकार्य केली. मृतकांचं नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

शनि दर्शन घेऊन इंदोरला परतणार होते
भीषण अपघात होण्याअगोदर सर्व जण नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथे शनिवारी रात्री आपले मित्रांकडे मुक्काम केला आणि रविवारी सकाळी शनिशिंगणापूर येथे दर्शन घेऊन देवगड येथे दर्शनासाठी गेले. तेथून इंदोरच्या दिशेने जाणार होते. विशेष म्हणजे राणू शर्मा यांनी नुकतीच ‘सीए’पदवी घेतली आहे. कार चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

हे ही वाचा : 

Karnataka Shakti Yojana: कर्नाटकात महिलांना आजपासून मोफत बस प्रवास; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

पैठणची शाळा घडवतेय टाळकरी अन् कीर्तनकार !

Back to top button