नगर बाजार समिती निवडणूक : सत्ताधार्‍यांविरुद्ध विरोधकांची वज्रमूठ! | पुढारी

नगर बाजार समिती निवडणूक : सत्ताधार्‍यांविरुद्ध विरोधकांची वज्रमूठ!

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : बाजार समिती निवडणुकीसाठी अखेर भाजप-सेनेने रणशिंग फुकले. सत्ताधारांच्या विरोधात निवडणुकीत ताकदीने उतरण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. यामुळे या निवडणुकीच्या हलचालींना गती आली आहे. सत्ताधारी व विरोधकांच्या बैठकांना जोर आला आहे. असे असले तरी उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशीच 20 एप्रिलला अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
बाजार समिती निवडणुकीच्या पार्शभूमीवर नेवासा भाजप- सेनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांची बैठक पार पडली. प्रारंभी या निवडणुकी संबंधी सूचना, मार्गदर्शन व रणनीतीवर माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी मार्गदर्शन केले. तसेच, ही निवडणूक पूर्ण ताकतीने लढवावी लागणार असल्याचे व त्यासाठी सत्ताधार्‍यांच्या विरोधात विरोधकांची वज्रमुठ बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. माजी आमदार मुरकुटे यांनी बैठकीत उपस्थितांना निवडणूक रणनीतीविषयी मार्गदर्शन केले.

बैठकीस जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, बाजार समितीचे संचालक शंकरराव लोखंडे, माजी सभापती भगवान गंगावणे, भाजप युवा मोर्चाचे प्रताप चिंधे, अंकुश काळे, माजी उपसभापती देवीदास साळुंके, सेनेचे तालुकाध्यक्ष सुरेश डिके, युवा नेते अनिल ताके, विश्वास काळे, डॉ. बाळासाहेब कोलते, उत्तमराव कार्ले, नगरसेवक सुनील वाघ, ज्ञानेश्वर पेचे, बाळासाहेब क्षीरसागर, किशोर जाधव, निरंजन डहाळे आदी उपस्थित होते.

‘भाजप सर्वच निवडणुका लढणार’
निवडणुकीच्या माध्यमातून तालुक्यात राजकीय हलचाली वाढत चालल्या असून, आमदार शंकरराव गडाख व माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यात आरोप-प्रत्यरोपांच्या फैरी झडणार आहेत. पालकमंत्री विखे व खासदार लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्वच निवडणुका लढवल्या जातील, असे भाजपच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

हमाल मापाडी मतदार संघ बिनविरोध?
बाजार समिती निवडणुकीत एकूण 18 जागांसाठी मतदान होणार असून, हमाल मापाडी मतदार संघात माजी आमदार मुरकुटे समर्थकांना उमेदवार मिळू शकला नाही. त्यामुळे या गटातील जागा सत्ताधारी आमदार गडाख समर्थकांना बिनविरोध मिळण्याची शक्यता आहे. उर्वरित जागावर मात्र लक्षवेधी लढती होणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

Back to top button