श्रीरामपूर : शेतकर्‍यांच्या पिकासह साहित्यांची चोरी; शेतकरी त्रस्त | पुढारी

श्रीरामपूर : शेतकर्‍यांच्या पिकासह साहित्यांची चोरी; शेतकरी त्रस्त

श्रीरामपूर; पुढारी वृत्तसेवा : सध्या शेतकरी विविध संकटातून जात आहे. या संकटावर मात करीत शेतकरी गुजराण करीत आहे. परंतु बेलापूर-दिघी रस्त्यावर असणार्‍या शेतकर्‍यांच्या शेतातील पिके, विहिरीतील इलेक्ट्रिक मोटरी, स्टार्टर, पंप, केबल आदी साहित्यांची चोरी होत आहे. या रस्त्यावर वर्दळ कमी आहे. या शिवाय गुंड प्रवतीच्या लोकांचा हा अड्डा बनलेला आहे. त्यामुळे कोणी काही आवाज उठविल्यास त्यास दमबाजीचे प्रकार घडत आहेत. याबाबत पोलिसांकडे तक्रार करूनही ते कानाडोळ करीत आहेत.

दिघी रस्त्यावरील शेतकर्‍यांच्या शेतातील कापूस, सोयाबिन आदी पिकांची चोरी होत असल्याने शेतकर्‍यांनी ही पिके घेण्यास बंद केलेली आहे. चोरट्यासह या भागात हरिण, रानडुकरांचाही मोठा उपद्रव आहे. रानडुकरांपासून पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी शेतकरी मारूतराव राशिनकर यांनी आपल्या मक्याच्या पिकाभोवती वाघूर लावलेली होती. चोरट्यांनी ही वाघूरही चोरली. त्यामुळे या परिसरातील शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलेला आहे.

राशिनकर यांच्यासह या भागातील विश्वनाथ गवते, संदीप शह यांच्यासह अनेक शेतकर्‍यांच्या इले. मोटरी तसेच केबलची चोरी झालेली आहे. सध्या पिकांना पाणी देणे गरजेचे आहे. या परिस्थितीत मोटरींची चोरी होत असल्याने शेतकर्‍यांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना शेती करणे अवघड होऊन बसलेले आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.

पोलिसांचा सपशेल ‘कानाडोळा’
शेतकर्‍यांच्या साहित्यांची चोरी झाल्यानंतर तक्रार देण्यासाठी ते बेलापूर दूरक्षेत्रात गेले. पोलिसांनी प्रथमतः त्यांच्याकडे कानाडोळ केला. यानंतर त्यांच्याकडून केवळ तक्रार अर्ज घेण्यात आले. परंतु त्यावर काहीही झाले नाही. त्यामुळे पोलिस या चोरट्यांना पाठिशी तर घालीत नाही ना? अशी शंका शेतकर्‍यांना येऊ लागली आहे.

Back to top button