जळगाव जिल्ह्यात कामगारांना उन्हात काम करण्यास मनाई, कलम १४४ लागू | पुढारी

जळगाव जिल्ह्यात कामगारांना उन्हात काम करण्यास मनाई, कलम १४४ लागू

जळगाव पुढारी वृत्तसेवा – हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार जळगाव जिल्ह्यात पुढील आठवडा हा उष्माघाताचा राहणार आहे. त्यामुळे साडेबारा ते पाच या विशेष वेळेत काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी 144 कलम लागू केले आहे. या आदेशामध्ये अंग मेहनत करणाऱ्या कामगारांना उन्हात काम न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कामगारांकडून कुणालाही उन्हात काम करून घेता येणार नाही, असे आदेश निर्गमित केले आहेत.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी वाढत्या तापमानाचा पारा लक्षात घेता विशेष आदेश पारित केले आहेत. या आदेशात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यात दि. २५ पासून ते ३ जुन पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ चे आदेश लागू करण्यात येत आहे. या कालावधीत अंगमेहनत करणा-या कामगारांनी उन्हात काम करु नये तसेच कामगारांकडून उन्हात काम करुन घेता येणार नाही. ज्या कामाच्या ठिकाणी अत्यावश्यक काम असेल अशा ठिकाणी कामगारांना काम करण्यासाठी पुरेसे शेड तयार करणे, कुलर व इतर साधनांची व्यवस्था करुन घेण्याची जबाबदारी संबंधित मालकांची राहील, याबाबत काहीएक तक्रार असल्यास ती संबंधित ग्रामपंचायत, नगरपरिषद, पोलीस विभाग यांचेकडेस करता येईल. खाजगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी सकाळी १० वाजेपर्यंत कोचिंग सेंटर चाललवावेत. तद्नंतर सकाळी १० ते ५ या वेळेत कोचिंग क्लासेस सुरु ठेवायचे असल्यास कोचिंग सेंटर मध्ये पुरेसे पंखे, कुलर व तत्सम साधनांची व्यवस्था करण्याची जबाबदारी खाजगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांची राहील.

अत्यावश्यक व अति आवश्यक सेवेत काम करणाऱ्या खाजगी किंवा इतर संस्थांमध्ये कामगारांवर माणुसकी दाखवावी असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे.

Back to top button