राहुरी : शिक्षणाचा दर्जा तपासणे सर्वांची जबाबदारी : आ. तनपुरे | पुढारी

राहुरी : शिक्षणाचा दर्जा तपासणे सर्वांची जबाबदारी : आ. तनपुरे

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण भागात असणार्‍या झेडपीच्या शाळांना वर्गखोल्या नाहीत. या ठिकाणी दर्जेदार, गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आपण कमी पडत आहोत, हे मान्य केले पाहिजे. यामुळे मातृभाषेत शिक्षण देणार्‍या शाळांच्या शिक्षणाची गुणवत्ता तपासण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांनी केले. राहुरी नगर पालिकेची नूतन मराठी शाळा नंबर 2 जोगेश्वरी आखाडा येथे मिशन आपुलकी अंतर्गत पुण्याच्या डॉ. विठ्ठलराव लक्ष्मण भुजाडी यांच्या माध्यमातून सीएसआर फंडातून 40 लाखांचा निधी दिला. या निधीतून शाळेच्या विकास कामांचे भूमिपूजन आ. तनपुरे यांच्या हस्ते झाले.

यावेळी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, नगर पालिका सीईओ डॉ. सचिन बांगर, शिक्षण विभागाचे संयुक्त सचिव अशोक भोसले, सीएसआर फंड देणारे डॉ. विठ्ठलराव भुजाडी, पोलिस निरिक्षक डांगे, नगरसेवक प्रकाश भुजाडी, विलास तनपुरे, विजय डोले, शिक्षण विस्तार अधिकारी अर्जुन गारूडकर, प्रशासन अधिकारी भाऊसाहेब थोरात, मुख्याध्यापक रावजी भोजने आणि परिसरातील पालक, विद्यार्थी आदी उपस्थितीत होते.

आज ग्रामीण भागात इंग्रजी शाळांचे पेव फुटले असून या ठिकाणी शिकवणार्‍या शिक्षकांच्या अध्यापनाचा दर्जा योग्य आहे की नाही, हे तपासण्याची गरज आहे. मी नगराध्यक्ष असताना नगर पालिकेच्या शाळा त्यांचे वर्ग कसे डिजिटल होतील, यासाठी प्रयत्न केले.
तत्पूर्वी आ. तनपुरे, शिक्षणाधिकारी पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते जोगेश्वरी आखाडा शाळेच्या सुमारे 40 लाख रुपये किमतीच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले.

साईसंस्थानचा निधी पडून
जिल्हा परिषदेच्या 700 ते 800 शाळांना वर्गखोल्या नाहीत. पाच वर्षांपूर्वी शिर्डी संस्थानने झेडपीच्या शाळांना वर्ग खोल्या बांधण्यासाठी 20 कोटींचा निधी दिला होता. पण या शाळा कोणी बांधावयाच्या या वादात हा निधी अद्यापि खर्च झालेला नसल्याचे आ. प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

Back to top button