कोल्हापूर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून तरुणाची ८ लाखाची फसवणूक

कोल्हापूर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून तरुणाची ८ लाखाची फसवणूक

किणी; पुढारी वृत्तसेवा : शेअर मार्केटमध्ये अधिक नफा देण्याचे आमिष दाखवत आभासी चलनाद्वारे २६ लाख ५८ हजारांचा नफा दाखवून सोमवारी (दि.१७)  एका तरूणाची आठ लाखाची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी  रितेश रामराव पवार (रा.नवे पारगाव, ता.हातकणंगले) या तरूणाने दिलेल्या फिर्यादीनुसार वडगाव पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत वडगाव पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, नवे पारगाव (ता.हातकणंगले) येथील रितेश पवार यांचा मोबाईल, कॉम्प्युटर विक्री व दुरुस्तीचा व्यवसाय आहे. ते शेअर मार्केटमध्येही गुंतवणूक करतात. मार्च महिन्यात त्यांच्या इन्स्टाग्राम आकाऊंटवर मॉरिशस येथील एका कंपनीची अधिक नफा मिळविण्यासाठी शेअर मार्केटचे प्रशिक्षण देणारी एक जाहिरात आली. या कंपनीचे गोरेगाव मुंबई येथे कार्यालय दाखविण्यात आले होते. त्या जाहिरातीतील एका मोबाईल नंबरला पवार यांनी संपर्क साधून माहिती घेतली.त्यानंतर त्यांना कंपनीच्या वतीने लिंक पाठविण्यात आली. त्या लिंकद्वारे त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले.या दरम्यान कंपनीच्या वतीने पवार यांच्या संपर्कात असणाऱ्या दोघांनी त्यांचा विश्वास संपादन केला. सुरवातीला त्यांना १० हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगून नफाही कमवून दिला. तो नफा पवार यांनी काढून घेतला. यानंतर थोडे थोडे असे सुमारे आठ लाख रुपये त्यांनी त्या डिमॅट खात्याद्वारे गुंतविले.

काही दिवसातच त्यांच्या त्या खात्यावर २६ लाख ५८ हजार रुपये नफा झाल्याचे आभासी पद्धतीने दाखविण्यात आले. पवार यांनी झालेला नफा काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते पैसे त्यांच्या बँक खात्यावर जमा होत नसल्याचे लक्षात आल्याने त्यांनी त्यांच्या संपर्कात असणाऱ्या कंपनीच्या व्यक्तींशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांना नफ्याच्या रक्कमेपैकी २० टक्के रक्कम टॅक्स म्हणून भरा, मगच रक्कम मिळेल, असे सांगण्यात आले. मात्र पवार यांनी झालेल्या नफ्यातून टॅक्स वजा करून उर्वरित रक्कम परत करण्याची विनंती कंपनीस केली. त्यानंतर कंपनीने नकार देत त्यांचे डिमॅट खाते गोठवले. तसेच ते व्यवहार करत असणारे अँपलिकेशनही बंद करून टाकले. आठ दिवसानंतर व्यवहार होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे पवार यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन मोबाईल नंबरवरून बोलणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरूद्ध वडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news