नगर : जेऊरला ग्रामविकास अधिकारी मिळेना ! | पुढारी

नगर : जेऊरला ग्रामविकास अधिकारी मिळेना !

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा :  नगर तालुक्यातील जेऊरला गेल्या अनेक महिन्यांपासून कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी मिळत नाही. त्यामुळे गावातील अनेक कामांचा खोळंबा होत आहे. अनेकांची बिले रखडली असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. त्यामुळे जेऊर येथे कायमस्वरूपी ग्राम विकास अधिकार्‍याची नियुक्ती करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रेमराज तोडमल यांच्यासह ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. जेऊर गाव ग्रामपंचायतीमध्ये सुमारे एक वर्षापासून कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारीच नाही. सहा महिन्यात चार ग्रामविकास अधिकारी नियुक्त करण्यात आले. परंतु त्यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. ग्रामविकास अधिकार्‍यांंअभावी अनेक प्रश्न रेंगाळत पडले आहेत.

गावात आरोग्य, गटार, ग्रामसुरक्षा यंत्रणा बंद, पाण्याची समस्या, वीज, ग्रामस्वच्छता अशा अनेक समस्या असताना ग्रामविकास अधिकारी नसल्याने समस्यांचे निराकरण होत नाही. अतिवृष्टीमुळे अनेक रस्ते, पूल वाहून गेले आहेत. त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी गटारी तुंबल्या आहेत. तसेच कचर्‍याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
जेऊर गावातील विविध समस्या व नागरिकांची हेळसांड थांबविण्यासाठी कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी नियुक्त करण्याची मागणी प्रेमराज तोडमल यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

जेऊर गावात कचरा, ग्रामस्वच्छता, गटार, पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी नसल्याने नागरिकांच्या कामांचा देखील खोळंबा होत आहे. कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी नियुक्त होणे गरजेचे आहे.
                                        – मायकल पाटोळे, अध्यक्ष, फ्रेंड्स ग्रुप, जेऊर.

सद्यस्थितीत तालुक्यात चार ते पाच ठिकाणी ग्रामविकास अधिकारी, तसेच सहा ते सात ठिकाणी ग्रामसेवकांच्या जागा रिक्त आहेत. तालुक्यात मंजुरीपेक्षा अधिकार्‍यांची संख्या कमी आहे. प्राधान्याने जेऊरला ग्रामविकास अधिकारी देण्यात येणार आहे.
                                      -श्रीकांत खरात,  गटविकास अधिकारी, पं.स.

Back to top button