शिर्डी : पंतप्रधान मोदी जगाचे नेते : पंकजा मुंडे | पुढारी

शिर्डी : पंतप्रधान मोदी जगाचे नेते : पंकजा मुंडे

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे नव्हे तर जागतिक नेते म्हणून ओळखले जात असल्याचे मत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी गुरुवारी सकाळी शिर्डी येथे साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. साई मंदिरात मनसेचे माजी नगरसेवक दत्तात्रय कोते व भाजपचे शिर्डी शहर उपाध्यक्ष रवींद्र कोते यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, सध्या सर्वच ठिकाणी बदल होत आहे. वैचारिक पातळीवरही दर्जा वाढत जाऊन बदल होताना दिसतो. मात्र हा बदल होताना संस्कृतीचे नुकसान होऊ नये, हे महत्त्वाचे आहे.

राजकारण हा विषय सर्वत्र असतो. प्रत्येक क्षेत्रात राजकारण चालते. मात्र ते सकारात्मक केले पाहिजे. नुकत्याच ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या असून आमच्या जिल्ह्यात बहुतांशी ग्रामपंचायतीवर आमची सत्ता आली आहे. जनतेतून सरपंच व सदस्य निवडून आले आहेत. कोणताही सरपंच किंवा सदस्य असला तरी त्यास संपूर्ण माहिती नसते.  महिलांबरोबर पुरुष सरपंचांनाही प्रशिक्षण दिले पाहिजे. मी ग्रामविकास मंत्री असताना शिर्डीमध्येच राज्यातील सरपंचांचा मेळावा घेऊन प्रशिक्षण दिले होते.

अनेक ठिकाणी आरक्षणामुळे महिला सरपंच झाल्या असून त्यांना घरातील पुरुष मंडळींनी मार्गदर्शन करावे. पण त्यांना स्वतः कामे करून द्यावीत. अनेक इंजिनिअर व सुशिक्षित तरुण व महिला या परत आपल्या गावात, ग्रामीण भागात येऊन गावच्या विकासासाठी निवडणूक लढवून सरपंच होत आहेत, ही आनंदाची बाब आहे. समृद्धी महामार्गामुळे अनेक शहरे जवळ येणार आहेत. समृद्धी महामार्गामुळे सर्व क्षेत्राचा विकास होणार आहे. असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी साईराज गायकवाड, अशोक गायके ,प्रवीण घुगे, सोमराज कावळे, सोनू ठोंबरे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button