पारनेर : नागेश्वर मंदिरातील चोरीचा तपास लावा | पुढारी

पारनेर : नागेश्वर मंदिरातील चोरीचा तपास लावा

पारनेर; पुढारी वृत्तसेवा : शहरातील ग्रामदैवत नागेश्वर मंदिरातील चोरीचा तपास लावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. पोलिस निरीक्षक घनशाम बळप यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरातील पिंड व पार्वतीच्या तांदळ्यावरील सुमारे दहा किलो वजनाच्या साडेसात लाख रुपये किंमतीच्या चांदीच्या आवरणाची चोरी नुकतीच झाली.

चारचाकी वाहनातून आलेल्या तीन चोरट्यांनी ही चोरी केल्याची प्राथमिक माहिती आहे. मुख्य प्रवेशद्वाराचे कुलुप तोडून श्री नागेश्वराच्या पिंडीवरील, तसेच पार्वतीच्या तांदळ्यावरील चांदीच्या आवरणाची चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. घटनेची माहिती मिळताच विश्वस्त संजय वाघमारे, शिरीष शेटिया,उदय शेरकर यांसह पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांनी तातडीने मंदिराकडे धाव घेतली.

चोरट्यांचा माग काढण्यासाठी नगर येथून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. श्वानाने मंदिराच्या पूर्वेला शंभर मीटर अंतरावरील मुख्य रस्त्यापर्यंत चोरट्यांचा माग काढला. तेथून चोरटे वाहनातून पसार झाले असावेत, असा निष्कर्ष काढण्यात आला होता. दरम्यान चोरी होऊन तीन दिवसांनंतरही चोरट्यांबाबत कोणताही सुगावा लागत नसल्याने शहरातील ग्रामस्थ व भाविकांनी पारनेरचे पोलीस निरीक्षक घनशाम बळप यांची भेट घेऊन त्यांना या घटनेचा लवकर तपास करून चोरट्याना जेरबंद करण्याची मागणी करीत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

यावेळी नागेश्वर मंदिर उत्सव समितीचे अध्यक्ष संजय वाघमारे, दत्तात्रय अंबुले, शिरीष शेटिया, शांताराम रायसोनी, दिनकर बडवे,विजय डोळ, उदय शेरकर यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, सामाजिक कार्यकर्ते शाहीर गायकवाड, रा.या. औटी,नगरसेवक अशोक चेडे, सचिन औटी, नंदकुमार औटी, योगेश मते, बाळासाहेब कावरे, बाळासाहेब नगरे, भूषण शेलार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Back to top button