नगर : तहसीलदारांच्या चौकशीसाठी आंदोलनाचा इशारा | पुढारी

नगर : तहसीलदारांच्या चौकशीसाठी आंदोलनाचा इशारा

पाथर्डी तालुका, पुढारी वृत्तसेवा : शेवगाव तहसीलदार छगन वाघ यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड केली आहे. निवेदनाची तत्काळ दखल घेतली नाही, तर 15 ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयात बेमुदत बैठा सत्याग्रह व घंटानाद आंदोलनाचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शेवगाव तहसील कार्यालयात छगन वाघ हे तहसीलदार म्हणून वर्षभरापासून आहेत. आल्यापासून त्यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने, निष्काळजी व मनमानी कामकाज केले आहे. तहसील कार्यालय दलालांचा अड्डा बनविला असून प्रत्येक विभागाला स्वतंत्र खासगी दलाल नेमले आहेत. अवैध व्यवसाय करणार्‍यांना हाताशी धरून माया कमाविली आहे.

शेवगाव तालुक्यात गोदावरी, ढोरा व अनेक छोट्या-मोठ्या नद्या असल्याने या भागात वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणात होत आहे. कोणाच्या आशीर्वादाने हे व्यवसाय सुरू आहेत. काहीतरी गौडबंगाल असल्याशिवाय वाळू माफिया राजरोस वाळूचा व्यवसाय करू शकत नाहीत. वाळूचे हप्ते गोळा करण्यासाठी खासगी दलाल नेमले आहेत. त्यांच्या मदतीने अवैध व्यवसाय करणार्‍यांना अभय देऊन मलिदा लाटण्याचे काम होत आहे. त्यामुळेच मागील आठवड्यात 27 जुलै रोजी शेवगाव तहसील कार्यालयातील सहाय्यक लिपिकाकडे गौणखनिज शाखाप्रमुख म्हणून असणारे हरेश्वर सानप यांना लाच घेताना रंगेहात पकडले.

वास्तविक साधा कारकून एक लाख रुपये किरकोळ कामासाठी मागणी कशी करू शकतो, त्याची एवढी मोठी रक्कम मागण्याची हिम्मत तरी कशी होते? कार्यालयामध्ये पूर्णवेळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असताना भ्रष्ट कारभार या तहसील कार्यालयात अनेक दिवसांपासून सुरू आहे, सानप हे फक्त एक निमित्त आहे.

तहसीलदार वाघ यांची उच्चस्तरीय चौकशी करून भ्रष्ट कारभार करणार्‍या अधिकार्‍यांवर कायदेशीर कारवाई करावी. निवेदनाची दखल घेतली नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Back to top button