नगर : समृद्धीच्या मातीने बेभरवशी धोका! | पुढारी

नगर : समृद्धीच्या मातीने बेभरवशी धोका!

महेश जोशी

कोपरगाव : समृद्धी महामार्गाच्या कामाच्या पुलासाठी गोदावरी नदीपात्रात संवत्सर गावालगत टाकलेल्या मातीच्या भरावाने पाण्याची पातळी मोजण्यास केंद्रीय जल आयोगाला मोठ्या अडचणी येत आहेत. त्याची तक्रार थेट जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे.
समृद्धी महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असून, तेथेच गोदावरी नदीवर पूलाचे काम सुरू आहे. पुलाच्या ठेकेदाराने नदी पात्रात मातीचा ढीग टाकून उंच रस्ता तयार केल्याने पाणी मोजण्याच्या प्रक्रियेस अडथळा निर्माण झाला आहे.कोपरगाव परिसरात वार्निंग लेव्हल साडेपाच मीटर आहे. साडेआठ मीटर पाणी झाल्यास धोक्याची पातळी समजली जाते. भरावामुळे पाणी अडून चार मीटर बॅकवॉटरचा थोप आला.

गोदापात्र जवळपास 63 हजार क्यूसेक्स पाणी वाहत आहे. भरावामुळे पाणी पातळी मोजण्यात अडथळे येत असल्याची तक्रार आयोगाने केंद्राच्या वरिष्ठ कार्यालयास कळविली असून केंद्रीय कार्यालयाने नगर जिल्हाधिकारी आणि कोपरगाव तहसीलदारांना त्याबाबत सूचना केल्या आहेत. महामार्गाच्या माने यांच्याशी संपर्कही साधूनही कारवाई झाली नाही. वास्तविक समृद्धी महामार्गाच्या पुलाचे काम मेपूर्वीच पूर्ण होणे अपेक्षित होते. ते न झाल्याने आता केंद्रीय जल आयोगाच्या पाणीपातळी मोजण्याला अडथळे येत आहेत. गोदावरीला सव्वा लाख क्युसेक पाणी सोडल्यावर कोपरगावचा छोटा पूल पाण्या खाली जातो.समृद्धी महामार्गाच्या ठेकेदाराने भराव बाजूने किरकोळ खोदून पाणी काढण्याचा प्रयत्न केला, मात्र बांध बंधारा मोठा असल्याने पाणी आडत आहे. परिणामी पाणी पातळी वाढल्याची चुकीची नोंद होणार आहे.

प्रशासनाचे परिस्थितीवर लक्ष
गोदावरी नदी पात्रात पाणी वाढल्यास कोपरगाव शहरासह इतर खेड्यांनाही मोठा धोका होणार आहे. ही बाबा दोन महिने अगोदरच केंद्रीय जल आयोगाच्या यंत्रणेने निदर्शनास आरून द्यायला हवी होती. मात्र आता ऐनवेळी जिल्हाधिकारी व तहसीलदारांना कळविल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. तरीही प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

Back to top button