नगर : ग्रामस्थांनी रोडरोमिओंना चोप देऊन केले मुंडण | पुढारी

नगर : ग्रामस्थांनी रोडरोमिओंना चोप देऊन केले मुंडण

कोळगाव : पुढारी वृत्तसेवा : कोळगावमधील शालेय विद्यार्थिनींची छेडछाड करणार्‍या रोडरोमिओंनाना पालकांनी व ग्रामस्थांनी पकडून चोप दिला. त्यातील एकाचे मुंडण करण्यात आले. पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेलेल्या पालकांना गावातील नेतेमंडळींनी व पोलिसांनी घेतलेल्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे रोडरोमिओंवर गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

त्याचे असे झाले की, श्री कोळाई देवी विद्यालयातील काही मुली शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना तीन-चार रोडरोमिओंंनी पाठलाग करून त्यांची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. त्यातील काही मुलींचे पालक सुदैवाने जवळच असल्याने त्या मुलींनी याबाबत पालकांना कल्पना दिली. पालकांनी व इतर ग्रामस्थांनी तत्काळ या रोडरोमिओंंना ताब्यात घेऊन चोप दिला व नंतर त्यातील एकाचे मुंडण केले.

या टवाळखोरांना धडा शिकवण्यासाठी या मुलीच्या पालकांनी बेलवंडी पोलिस ठाणे गाठले. तेथे या मुलांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याविषयी पोलिसांना सांगितले. परंतु गावातील नेतेमंडळी व काही ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्याने व पोलिसांनीही सामंजस्याची भूमिका घेऊन या रोडरोमिओंची प्रथम झाडाझडती घेतली. त्यांना चांगली समज दिली. त्यांच्या पालकांना बोलावून त्यांच्या या कृत्याविषयी पालकांची ही कानउघाडणी केली. सर्वानुमते एवढ्या वेळेस या टवाळांना माफ करून जर पुन्हा अशी चूक केली, तर मात्र गय करू नका, अशी भूमिका नेतेमंडळी व पालकांनी घेतली. त्यामुळे या रोडरोमिओंवर गुन्हा दाखल होऊ शकला नाही.

शाळेत जाऊन मार्गदर्शन

बेलवंडीचे पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी बेलवंडी पोलिस ठाणे हद्दीतील कोळगाव या गावातील कोळाईदेवी माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज या ठिकाणी स्वतः जाऊन शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना मार्गदर्शन केले. शाळेतील विद्यार्थ्यांना सायबर क्राईम, अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, महिला व मुलींच्या विषयीचे कायदे, महिलांच्या छेडछाडीचे विषयी घडणार्‍या घटना व उपाय, तसेच सदरच्या घटना घडू नयेत, म्हणून आपण काय काळजी घ्यावी, याबाबत शाळेतील मुलांना मुलींना मार्गदर्शन केले. मुलींना शाळेत येताना प्रवासामध्ये छेडछाड होऊ नये व शाळेच्या आवारामध्ये किंवा शाळेच्या बाहेर होऊ नये म्हणून काय उपाययोजना कराव्यात, याबाबत त्यांना मार्गदर्शन केले आहे.

सदर घटनेमुळे गावातील ऐक्य बिघडू नये व शांतता टिकून रहावी तसेच एकमेकांमध्ये वैरभाव निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला, असे पुरुषोत्तम लगड व हेमंत नलगे यांनी सांगितले. श्रीगोंदा कारखान्याचे माजी संचालक हेमंत नलगे, कुकडी कारखान्याचे संचालक मच्छिंद्र नलगे, कोळगावचे सरपंच वर्षा काळे, उपसरपंच सारिका मोहारे, माजी उपसरपंच नितीन नलगे, अमित लगड, शरद लगड, विजय नलगे, संतोष मेहत्रे, सामाजिक कार्यकर्ते नितीन डुबल, विश्वास थोरात, सुयश जाधव, प्राचार्य दांगडे एच के, उपप्राचार्य जंगले आर. एस., पर्यवेक्षक बी. ए. धुमाळ, विद्यालयातील सर्व सेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलिसांचे पालकांना आवाहन

शाळेच्या नोटीस फलकावर पोलिस ठाण्याचा दूरध्वनी क्रमांक व प्रभारी अधिकार्‍यांचा क्रमांक लिहिण्याबाबत प्राचार्यांना सूचना दिल्या. विद्यार्थ्यांनाही त्यांना काही अडचण असल्यास त्यांनीही स्वतः फोन करावा, असे त्यांना पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी आवाहन केले आहे.

Back to top button