नगर : नदी कसली, ही तर गटारगंगा! चोवीस लाख नालेसफाईला अपुरे | पुढारी

नगर : नदी कसली, ही तर गटारगंगा! चोवीस लाख नालेसफाईला अपुरे

नगर : पुढारी वृत्तसेवा : पावसाळा सुरू होऊनही अद्याप शहरातील नालेसफाई व सीना नदीचे सफाई पूर्ण झालेली नाही. शहरातील मैला सीनेत सोडलेला आहे. त्यातून सीनेचे नदी रूपच हरवले असून ती गटारगंगा झाल्याचा आरोप नगरसेवकांनी स्थायी समितीच्या सभेत केला. त्यावर अधिकार्‍यांनी नदी स्वच्छतेसाठी 24 लाख नालेसफाईला अपुरे पडत असल्याचे सांगितले.

दरम्यान, वाढी निधीसाठी प्रस्ताव तयार करा पण नाल्यातील गाळ काढा. लोकवस्ती असलेल्या सीना काठ परिसरात तत्काळ सफाई मोहीम हाती घ्या, सूचना सभापती कुमारसिंह वाकळे यांनी अधिकर्‍यांना दिल्या. महापालिकेची स्थायी समितीची सभा शुक्रवारी सकाळी सभापती कुमार वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत नगरसेवक समद खान, मुद्दसर शेख, विनीत पाऊलबुद्धे, गणेश कवडे, रुपाली वारे, रवींद्र बारस्कर आदी चर्चेत सहभागी झाले. यावेळी सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. स्थायी समितीच्या बैठकीत 12 विषयांवर मंजुरी देण्यात आली.

रत्नागिरी : शालाबाह्यसाठी ‘मिशन झिरो ड्रॉपआऊट’

सभेच्या सुरूवातीलाच शहरातील नालेसफाईचे काम किती टक्के झाले अशी विचारणा सभापती कुमार वाकळे यांनी केली. त्यावर सर्वच सदस्यांनी प्रत्येक प्रभागात नालेसफाईचे काम अपुरे राहिल्याचे सांगितले. नगरसेवक विनीत पाउलबुद्धे यांनी प्रभाग एकमधील नाल्याचे काम अर्थवट राहिल्याचे सांगितले. तर, नगरसेवक रवींद्र बारस्कर यांनी प्रेमदार हाडको भागात नाल्याचे काम अद्यापही अपूर्ण असल्याचे सांगितले. नगरसेवक गणेश कवडे यांनी नालेगाव, वारूळाचा मारुती परिसरात सीना नदीतील गाळ काण्याचे काम करावे जेणे करून नदीला पूर आल्यानंतर कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही.

त्यावर नालेसफाई करणारे अधिकारी आर. जी. सातपुते यांनी 24 लाखांमध्ये संपूर्ण नालेसफाई होऊ शकत नाही. संबंधित ठेकेदाराचे अवघे काही तास शिल्लक राहिल्याचे सांगितले. त्यावर सभापती कुमार वाकळे यांच्यासह सर्वच सदस्यांनी वाढीव निधीचा प्रस्ताव तयार करून त्यास मंजुरी घ्या पण नालेसफाई पूर्ण करा. पावसाचे प्रमाण वाढण्याआधी महत्त्वाचे नाले व सीना नदीतील गाळ काढा. शहरात पावसाने कोणत्याही प्रकारची आपत्ती निर्माण होणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचना अधिकार्‍याना दिल्या.

ई-बस चार्जचे बिल कोण देणार?
महामंडळाची ई-बस महापालिकेच्या आवारात चार्ज केली जाते. त्याची वीजबिल आकारणी कशी होणार असा प्रश्न नगरसेवक मुद्दसर शेख यांनी विचारला. त्यावर उत्तर देताना अधिकारी गडबडून गेले. रिडींगप्रमाणे एसटी महामंडळाकडून आकारी करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्या चाजिंग पाईंटची जागा बदलण्याची सूचना सदस्यांनी केली.

अधिकार्‍यांचे काढले वाभाडे
नगर स्थापना दिनानिमित्त शहरात मोफत नगर दर्शनसाठी एक शहर बस देण्यात आली होती. त्यात अनेकांनी प्रवास करून नगर दर्शन घेतले. मात्र, त्याच्या बालासंदर्भात प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीत आल्यानंतर सभापती कुमार वाकळे यांनी या बसमध्ये किती नागरिक फिरले आणि त्यांची नावे काय असे म्हणून अधिकार्‍यांचे वाभाडे काढले. यापुढे अशी कोणतीही योजना राबवायची असल्यास नगरसेवकांना कळवावे, अशा सूचना वाकळे यांनी दिल्या.

… तर होईल रक्त संकलन : पाउलबुद्धे
महापालिकेच्या प्रत्येक नगरसेवकाच्या वाढदिवसाच्या दिवशी मनपा रक्तपेढीतर्फे रक्तदान शिबिर घेण्याबाबत सूचना केल्या होत्या. मात्र, काही ठराविक नगरसेवक वगळता अन्य नगरसेवकांना याबाबत सूचनाही देण्यात आली नाही. मग रक्त पिशव्यांचे संकलन कसे होणार असा सवाल नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे यांनी उपस्थित केला. तसेच, कोविडच्या माहितीसारखी रक्त संकलन पिशव्या व त्यासंदर्भातची माहिती दररोज नगरसेवक व अधिकार्‍यांना पाठविण्यात यावी

रक्तपेढीचे अधिकारी निरूत्तर
महापालिकेच्या रक्तपेढीने रक्तदात्याला मोफत रक्तपिशवी देणे आणि अन्य नागरिकांना शंभर रुपयाला रक्त पिशवी देणे असा ठराव महासभेत झाला होता. त्यास चार महिने झाले तरी अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नाही. यासंदर्भात सभापती वाकळे यांनी रक्तपेढीचे अधिकारी शेंडगे यांना विचारणा केली असता ते निरूत्तर झाले. त्याबाबत त्यांना काहीच सांगता येत नव्हते. त्यामुळे सर्वच सदस्यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले. उद्यापासून त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल, असे शेंडगे यांनी मनपामध्ये सांगितले. बजेटमध्ये तरतुद करूनही अंमलबजावणी होत नाही यापुढे संबंधित कारवाई करण्यात येईल, असे वाकळे यांनी सांगितले.

Back to top button