मोडतोडीने दिग्गजांची कोंडी; 11 सदस्यांची नव्या गटासाठी शोधाशोध | पुढारी

मोडतोडीने दिग्गजांची कोंडी; 11 सदस्यांची नव्या गटासाठी शोधाशोध

नगर : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रारूप गट, गणांची रचना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या सूचनेनुसार आज जाहीर करण्यात आली. त्यात माजी अध्यक्षा शालिनी विखे, राजश्री घुलेंचे गट शाबूत राहिले, तर माजी 11 सदस्यांचे गट मात्र संपुष्टात आले आहेत. त्यांना आता नव्या गटातून निवडणूक लढवावी लागणार आहे. बहुतांश गटांची मोडतोड झाल्याने तेथे दिग्गजांची कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले.

गत पंचवार्षिक निवडणुकीत जिल्हा परिषदेचे 73 गट आणि 14 पंचायत समितीच्या 146 गणांत निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीत आघाडीची सत्ता आली. 20 मार्चला जिल्हा परिषद सदस्यांची मुदत संपल्यानंतर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक प्रक्रिया आयोगाकडूनसुरू असून आज प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्याचा पहिला टप्पा पार पडला. नव्या रचनेत जिल्ह्यात 12 गट आणि 24 गणांच्या वाढलेल्या संख्येसह नव्या रचनेत 85 गट आणि 170 गणांचा प्रारुप आराखडा प्रसिद्ध करण्यात आला.

सातारा : प्रकल्प, सिंचन मंडळातील भानगडींची चौकशी सुरू

नव्या गट रचनेत जुन्या 11 गटांचे अस्तित्व संपुष्टात आणताना त्यातील काही गावे शेजारच्या जुन्या तर काही नवीन गटांना जोडण्यात आली.ही मोडतोड करताना अकोलेचे कैलास वाकचौरे, नेवाशाचे सुनील गडाख, तेजश्री लंघे, संगमनेरचे महेंद्र गोडगे, शेवगावच्या हर्षदा काकडे, नगरचे माधवराव लामखडे यांच्या गटाची नावे बदलून नव्या नावाने गट अस्तित्वात आले. त्यामुळे या दिग्गजांना नव्या गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढावी लागणार आहे. बांधकाम समितीचे माजी सभापती काशीनाथ दाते, शिवसेनेचे संदेश कार्ले, शरद नवले, बाळासाहेब हराळ यांच्या गटाची मोडतोड होऊन त्यांच्या गटातील गावे दुसर्‍या गटात सामाविष्ट झाल्याने त्यांची अडचण झाली आहे.

दरम्यान, गट, गणांच्या मोडतोडीमुळे काहींची राजकीय सोय झाली, तर काहींची मात्र अडचण झाल्याचे प्रारूप आराखड्यातून समोर आले आहे. जिल्हा परिषदेच्या गट व पंचायत समितीच्या गण प्रारूप रचनेवर 8 जूनपर्यंत हरकती मागाविण्यात आल्या आहेत. त्यावर सुनावणी होऊन गट, गण अंतिम केले जाणार आहेत.

जिल्हा परिषद गट 85
पंचायत समिती 170

हेही वाचा

आ. शिवेंद्रराजे-आ.रोहित पवारांची ‘तुझी-माझी जोडी’

मंत्री थोरात, पटोलेंचा आंदोलक शेतकर्‍यांशी संवाद; शेतकर्‍यांच्या प्रश्नांबाबत राज्य सरकार सकारात्मक

ऐतवडे बुद्रुक : पक्ष्यांच्या हालचालींवरून पावसाचा अंदाज

Back to top button