नगर : पुढारी वृत्तसेवा : नगर शहरात विविध चौकात व महामार्गावर 384 होर्डिंग आहेत. त्यातील अनेक होर्डिंगची परवानगीची मुदत संपली असून, तरी होर्डिंग थाटात उभे आहेत. मंजूर साईज आणि प्रत्यक्षस्थळावर होर्डिंगची साईज यामध्ये मोठी तफावत आढळून आले. परवानगी संपल्यानंतर होर्डिंग उभे राहत असल्याने त्याचा मलिदा कोण खाते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे होर्डिंग उभारणार्या संस्थांना महापालिकेने नोटिसा धाडल्या असून, कागदपत्रांमध्ये कमतरता आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. मुंबई येथे महाकाय होर्डिंग वादळामुळे नागरिकांच्या अंगावर पडून सुमारे 14 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अहमदनगर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
नगर शहरातील अनधिकृत होर्डिंग फ्लेक्स काढण्याची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. तर, शहरात नेमके किती अधिकृत होर्डिंग आहेत, त्याचे ऑडिट झाले आहे काय, याच्या पाहणीसाठी गेल्या दोन दिवसांपूर्वी आयुक्तांनी पथक धाडले होते. पथकाने पाहणी केली असता अनेक गोष्ठी समोर आल्या. परवानगीची मुदत संपल्यांनतरही होर्डिंग उभे असल्याचे दिसले. तर, परवानगी घेताना होर्डिंगची साईज आणि प्रत्यक्षात उभे असलेल्या होर्डिंगच्या साईजमध्ये मोठी तफावत आढळून आली. तर, अनेक ठिकाणी होर्डिंगसाठी उभारण्यात आलेले लोखंडी सापळे धोकादायक स्थिती आढळून आले. त्यामुळे महापालिकेचे उपायुक्तांनी शहरातील होर्डिंग उभारणार्या संस्थांना नोटिसा धाडून कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आदेश दिले आहेत. कागदपत्रात त्रुटी आढळल्यानंतर कारवाईचा इशारा दिला आहे. दरम्यान, परवानगी संपल्यानंतरही होर्डिंग कोणाच्या आदेशानुसार उभा राहत होत्या, याचीही चौकशी करण्यात येणार आहे.
परवानगी संपली तरी होर्डिंग लावणार्या संस्थेवर कारवाई करण्यात येणार आहे. धोकादायक ठिकाणची होर्डिंग तत्काळ उतरविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
– डॉ. पंकज जावळे, आयुक्त
होर्डिंगवर कारवाईसाठी समिती
शहरातील अनधिकृत होर्डिंग, धोकादायक होर्डिंग फ्लेक्स बोर्ड, बॅनर्स यांच्यावर कारवाई करण्यासाठी महापालिका स्तरावर अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. ही येत्या आठ दिवसांत होर्डिंगची पाहणी करून आयुक्तांना अहवाल देणार आहे. अध्यक्ष अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, श्रीकांत पवार, विजयकुमार मुंडे, सहायक आयुक्त सपना वसावा, प्रभारी शहर अभियंता मनोज पारखे, अतिक्रमण विभागप्रमुख आदित्य बल्लाळ, प्रभाग अधिकारी संजय उमाप, राकेश कोतकर, अशोक साबळे, नानासाहेब गोसावी, जीपीएस समन्वयक शुभम घायाळ.