मंत्री थोरात, पटोलेंचा आंदोलक शेतकर्‍यांशी संवाद; शेतकर्‍यांच्या प्रश्नांबाबत राज्य सरकार सकारात्मक | पुढारी

मंत्री थोरात, पटोलेंचा आंदोलक शेतकर्‍यांशी संवाद; शेतकर्‍यांच्या प्रश्नांबाबत राज्य सरकार सकारात्मक

पुणतांबा : पुढारी वृत्तसेवा

शेतकर्‍यांचे प्रश्न योग्य आहेत. या प्रश्नांबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. याप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.
राहाता तालुक्यातील पुणतांबा येथे 1 जूनपासून शेतकर्‍यांनी धरणे आंदोलनाला सुरु केले आहे. मंत्री थोरात व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज गुरूवारी धरणे आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

मंत्री थोरात म्हणाले, पुणतांबेतील शेतकर्‍यांनी मांडलेले प्रश्न योग्य आहे. काँग्रेस पक्षाच्या शिर्डी येथे झालेल्या चिंतन शिबिरात देखील शेतकरी व शेती या विषयावर चर्चा झाली. पुणतांबा ही धार्मिक व चळवळीची भूमी आहे. शेतकर्‍यांनी मांडलेले प्रश्न वास्तवतेचे आहेत. ऊस, कांद्यासह दुधाची दरवाढ हे प्रश्न सुटलेच पाहिजे. यासाठी काँग्रेसने शेतकरी केंद्रबिंदू मानला आहे.

ऐतवडे बुद्रुक : पक्ष्यांच्या हालचालींवरून पावसाचा अंदाज

शेतकर्‍यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव घेऊन मंत्री मंडळात ते प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकर्‍यांना 8 तास वीज दिवसा पूर्ण दाबाने मिळाली पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे लक्ष वेधणार असल्याचे मंत्री थोरात यांनी सांगितले. 5 जूननंतर पुणतांबा येथील शेतकर्‍यांनी संगमनेर येथेे येऊन सर्व प्रश्नांची आपण चर्चा करू. सर्वांना बरोबर घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना भेटून प्रश्नांची सोडवणूक करणार असल्याचे मंत्री थोरात यांनी आवर्जून सांगितले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, शेतकरी आत्मा असल्याने पुणतांबा आंदोलनाला आम्ही भेट दिली. जून 2017 चा शेतकरी संप पुणतांबेकरांनी यशस्वी केला होता. त्याचा पटोले यांनी आवर्जून उल्लेख केला. शेतकर्‍यांच्या व्यथा सोडवण्याची काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. राज्य सरकारकडे शेती व त्यावरील समस्या सोडवून शेतकरी प्रगत झाला पाहिजे. शेती व्यवसायातून रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे. यासाठी सरकारला प्रस्ताव घेऊन त्यातून शेतकर्‍यांचे प्रश्न सोडण्याची प्रामाणिकपणे भूमिका मांडणार असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले.

सातारा जिल्हा परिषदेचे नवे गट-गण

पुणतांबेतील शेतकर्‍यांच्या मागण्याबाबत मंत्री थोरात व स्वतः मुख्यमंत्र्याकडे आग्रह धरून हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ठाम आश्वासन त्यांनी दिले. यावेळी सरपंच डॉ. धनंजय जाधव, सुहास वहाडणे, बाळासाहेब चव्हाण, सुभाष वहाडणे, मुरलीधर थोरात, निकिता जाधव यांच्यासह किसान क्रांतीचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी आंदोलकाची भेट घेवून, मार्गदर्शन करुन पाठिंबा दर्शविला.

कांदा, टरबूज, द्राक्षे मोफत वाटले..!

धरणे आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी गुरुवारी शेतकर्‍यांनी कांदा, टरबूज व द्राक्षे मोफत वाटले. दरम्यान, केंद्र व राज्य सरकारविरोधात शेतकर्‍यांना हमीभाव मिळाला पाहिजे, अशा गगणभेदी घोषणा देत संतापाला वाट मोकळी करुन दिली..!

संकट काळात बाळासाहेब दिसतात..!

अतिरिक्त उसाचा प्रश्न राज्यात निर्माण झाल्याचे मंत्री थोरात सांगत असताना किसान क्रांतीच्या पदाधिकार्‍यांनी या भागातील ऊस संगमनेरने नेऊन शेतकर्‍यांना मदत केल्याचे वाक्य ऐकवले. त्यावर मंत्री थोरात म्हणाले, संकट काळात आम्ही पक्ष गट-तट विसरतो. आपलाच भाग न पाहता सर्वांना मदत करतो, मात्र आम्ही या भागात आल्यानंतर आपल्या नेत्याला समजेल, या भीतीने कार्यकर्ते बाहेर येत नाहीत. यात काही नातेवाईक असल्याने सहकार्य मिळत असल्याचे सांगत संकट काळातच बाळासाहेब दिसतात, असे मंत्री थोरात म्हणाले.

 

Back to top button