Citylink Nashik | आठव्या दिवशीही सिटीलिंक कोंडीतच | पुढारी

Citylink Nashik | आठव्या दिवशीही सिटीलिंक कोंडीतच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सलग आठव्या दिवशीही वाहकांनी आपल्या मागण्यांवर ठाम राहात संप कायम ठेवला असताना, पर्यायी वाहक पुरवठादाराच्या नियुक्तीप्रक्रियेला किमान महिनाभराचा तरी कालावधी लागणार असल्यामुळे सिटीलिंकची पुरती कोंडी झाली आहे. दंडाची रक्कम माफ करण्यासाठी अडून बसलेला ठेकेदार आणि वेतनासह अन्य मागण्यांवर ठाम राहिलेले वाहक यामुळे इकडे आड तिकडे विहीर, अशी परिस्थिती सिटीलिंक प्रशासनाची झाली आहे.

सिटीलिंक बससेवेच्या चालक व वाहक पुरवठादार मक्तेदाराकडून वाहकांना वेळेत वेतन दिले जात नाही. भविष्य निर्वाह निधीची रक्कमदेखील खात्यात जमा होत नसल्याने दि. 14 मार्चपासून वाहकांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. गुरुवारी (दि. २१) संपाच्या आठव्या दिवशीही तोडगा निघाला नसल्याने संप कायम आहे. ठेकेदार ऐकत नसल्यामुळे सिटीलिंकनेच फेब्रुवारीपर्यंतच्या वेतनापोटी ६५ लाख रुपये वाहक पुरवठादार मॅक्स डिटेक्टिव्ह ॲण्ड सिक्युरिटीज या मक्तेदार कंपनीच्या खात्यात वर्ग केले आहेत. त्यानंतरही भविष्य निर्वाह निधीच्या रकमेसाठी वाहक अडून बसले. सिटीलिंक कंपनीने ती रक्कमदेखील वर्ग केली. मात्र, प्रलंबित वेतनासह इतर भत्ते आदींची 100 टक्के रक्कम खात्यात जमा होत नाही, तोपर्यंत डेपोतून बस हलू देणार नसल्याची भूमिका आंदोलक वाहकांनी घेतल्यामुळे संपावर आठव्या दिवशीही तोडगा निघाला नाही. सिटीलिंकने ‘मॅक्स’ या वाहक पुरवठादारास ठेका रद्द करण्याची नोटीस दिली आहे. मात्र ठेका रद्द करण्याचा निर्णय घेतल्यास पर्यायी वाहक पुरवठादार ठेकेदाराची नियुक्ती अद्याप झालेली नसल्यामुळे शहर बससेवा चालणार कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण नवीन निविदाप्रक्रिया आचारसंहितेच्या कात्रीत अडकली आहे.

‘तो’ दावा फोल ठरला!
नाशिक रोड विभागात नवीन मक्तेदार नियुक्त करण्यात आला आहे. परंतु १०० बसेसकरिता वाहक पुरवठ्याचा ठेका असताना संबंधित ठेकेदाराने ३५ बसेससाठी पुरेल इतकेच वाहक पुरविले आहेत. त्यामुळे या ठेकेदाराच्या नियुक्तीनंतर सिटीलिंकला संपाला सामोरे जावे लागणार नाही, हा दावा पुरता फोल ठरला आहे.

हेही वाचा:

Back to top button