Citylink Nashik | सिटीलिंक आता निवडणूक आयोगाला साकडे घालणार

Citylink Nashik | सिटीलिंक आता निवडणूक आयोगाला साकडे घालणार
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
'मॅक्स डिटेक्टिव्हज‌ ॲण्ड सिक्युरिटीज‌' या वाहक पुरवठादार ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे सिटीलिंकला तब्बल नऊ वेळा संपाची नामुष्की सहन करावी लागल्यानंतर आता नवीन ठेकेदार नियुक्तीची प्रक्रियादेखील लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या कात्रीत अडकली आहे. मुदतीत दोनच निविदा प्राप्त झाल्याने मुदतवाढ देण्याची तयारी सिटीलिंक प्रशासनाने केली असून, त्यानंतरही निविदाधारकांची संख्या न वाढल्यास प्राप्त निविदा उघडून पुढील प्रक्रिया राबविण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेतली जाणार असल्याची माहिती सिटीलिंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी दिली आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पपूर्तीसाठी महापालिकेने राज्य परिवहन महामंडळाकडील तोट्यातील शहर बससेवा चालविण्यास घेतली. त्यासाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळाची स्थापना करत ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट तत्त्वावर 'सिटीलिंक-कनेक्टिंग नाशिक'ची बससेवा सुरू केली गेली. दोन खासगी आॉपरेटर्सच्या माध्यमातून बस संचलन तर तिकीट विक्रीसाठी स्वतंत्रपणे 'मॅक्स डिटेक्टिव्हज‌ ॲण्ड सिक्युरिटीज‌' या वाहक पुरवठादार ठेकेदाराची नियुक्ती केली गेली. मात्र या वाहक पुरवठादाराने वाहकांना नियमित वेतन अदा न करणे, वेतन थकवणे, पीएफ, ईएसआयसी न भरणे आदी कारणांमुळे सिटीलिंकला गेल्या दोन वर्षांत तब्बल नऊ वेळा संपाला सामोरे जावे लागले. दरम्यानच्या काळात नाशिक रोड डेपोतील १०० बसेसकरिता युनिटी या नवीन वाहक पुरवठादाराची नियुक्ती केली गेली. परंतु सदर वाहक पुरवठादार केवळ ४० बसेसनाच वाहक पुरवठा करू शकला आहे. तपोवनातील १५० व नाशिकरोड डेपोतील ५० बसेसना वाहक पुरवठ्याचा ठेका 'मॅक्स' कडेच आहे. या ठेकेदाराची मुदत जुलैमध्ये संपुष्टात येत आहे. त्यामुळे नवीन ठेकेदार नियुक्तीसाठी सिटीलिंक प्रशासनाने निविदा प्रक्रिया सुरू केली होती. मुदतीत केवळ दोनच निविदा प्राप्त होऊ शकल्या आहेत. त्यामुळे निविदा प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुदतवाढीच्या कालावधीत प्राप्त निविदा उघडून ही प्रक्रिया अंतिम करणे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत अडचणीचे ठरणार आहे. विद्यमान ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे सात दिवसांपासून बससेवा बंद असल्यामुळे सिटीलिंकची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. त्यामुळे सिटीलिंकच्या अडचणी अधिक वाढू नये यासाठी नवीन वाहक पुरवठादाराची नियुक्ती मुदतीत होणे आवश्यक असल्याने प्रसंगी निवडणूक आयोगाकडून परवानगी घेण्याची तयारी सिटीलिंकने केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी चौधरी यांनी ही माहिती दिली आहे.

पर्यायी व्यवस्थेसाठी लगीनघाई
सिटीलिंकच्या विद्यमान वाहक पुरवठादार ठेकेदारास सिटीलिंकेचे व्यवस्थापकीय संचालक तथा महापालिकेचे प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी ठेका रद्द करण्याची अंतिम नोटीस बजावली आहे. ऐनवेळी ठेका रद्द करावयाचा झाल्यास पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याची लगीनघाई प्रशासनाकडून सुरू आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news