पुण्याला झालं तरी काय? अल्पवयीन मुलांकडून क्रिकेटच्या वादातून गोळीबार | पुढारी

पुण्याला झालं तरी काय? अल्पवयीन मुलांकडून क्रिकेटच्या वादातून गोळीबार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : क्रिकेट खेळताना अल्पवयीन मुलांमध्ये झालेल्या भांडणात थेट पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. त्यानंतर कोयत्याने एकमेकांवर वार करण्यात आले. विशेष म्हणजे यामध्ये दहावीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आल्या. त्यामुळे पुन्हा एकदा अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी दोन सतरा वर्षांच्या मुलांनी परस्पर विरोधी तक्रार दाखल केल्या. त्यानुसार बुधवारी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. तर आज (गुरुवारी) सात जणांना ताब्यात घेण्यात आले. दोन्ही गटातील मुले एकाच परिसरात राहतात. त्यातील काही जणांची दहावीची परीक्षा सुरू आहे.

मात्र परीक्षा असतानाही ते सलग पेपर नसल्याने मधील सुटीच्या काळात मैदानावर क्रिकेट खेळायला जमा होत होते. दोन्ही गटाच्या टीम तयार करून अगदी 50 ते 200 रुपयांपर्यंत मॅच लावली जात होती. दोन दिवसांपूर्वी मॅच झाल्यावर हरलेल्या गटातील मुलाने एकाला शिवीगाळ केली. मात्र, तेव्हा दुसर्‍या गटाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. घरी गेल्यावर मात्र एकमेकांशी फोनाफोनी करून शिवीगाळीचा जाब विचारण्याचे ठरले. त्यानुसार दुसर्‍या गटातील मुलाला फोन करून जाब विचारला गेला. त्यानंतर एकत्र जमून वाद मिटण्याचे ठरवण्यात आले. त्याप्रमाणे दोन्ही गट बुधवारी सायंकाळी सात वाजता संतोषनगर येथे जमले. तेथे आठ जणांच्या गटाने फिर्यादी त्याचे दोन अल्पवयीन साथीदार आणि ऋषीकेश बर्डे (वय 23, रा. शिवापूर) यास मारहाण केली. त्यानंतर रोहन पवार याने कमरेचे पिस्तूल काढून गोळी जमिनीवर झाडली. ऋषीकेश बर्डे व इतरांनी दुचाकीवर येऊन हाताने आणि कोयत्याने मारहाण केल्याचे म्हटले आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक समीर कदम करत आहेत.

हेही वाचा

Back to top button