Jayant Patil : मोदीजी, आपण फित कापून खुशाल श्रेय घ्यावे : जयंत पाटील | पुढारी

Jayant Patil : मोदीजी, आपण फित कापून खुशाल श्रेय घ्यावे : जयंत पाटील

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि. 26) महाराष्ट्र आणि गोवा दौर्‍यावर आहेत. महाराष्ट्र दौर्‍यात पंतप्रधानांच्या हस्ते सुमारे 7,500 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण, पायाभरणी आणि उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महाविकास आघाडी सरकारमधील जलसंपदा मंत्री राहिलेल्या जयंत पाटील यांनी आपल्या ‘X’ अकाउंटवर उपरोधिक पोस्ट करत म्हटलं आहे, “मोदीजी, आपण फित कापून खुशाल श्रेय घ्यावे. कारण आमच्या शेतकरी बांधवांना, माय भगिनींना आता पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही, ह्यात आमचा खरा आनंद सामावलेला आहे.” (Jayant Patil)

Jayant Patil : आपण फित कापून खुशाल श्रेय घ्यावे…

“मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रातील शिर्डी येथे विविध विकास कामांच्या पायाभरणी समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये निळवंडे धरणाच्या कालव्याचे लोकार्पण सुद्धा करण्यात येणार असल्याचे समजले. दुष्काळाच्या छायेत राहणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील गावांना अखेर दिलासा मिळणार आहे, याचा आनंद मला होत आहे.

१९७० ते २०१९ पर्यंत निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामासाठी सुमारे ११०० कोटी रुपये खर्च करून केवळ ४५ टक्के काम पूर्ण झाले होते. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांत कालखंडात जलसंपदा विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुमारे ९०० कोटींचा निधी देऊन मी या कालव्याचे ९० टक्के काम पूर्ण केले. या प्रकल्पाचे काम गुणवत्तापूर्ण व्हावे यासाठी मी स्वतः या कार्याची तीनदा जाऊन पाहणी केली. महाविकास आघाडी मधील तेथील लोकप्रतिनिधींनी या कामात बारकाईने लक्ष घातले. कोरोनोच्या काळात सरकारी तिजोरीवर आर्थिक भार होता, मात्र त्या परिस्थितीतही आम्ही विकास कामे थांबवली नाहीत. निळवंडे धरणाच्या कालव्याचे काम एका निर्णायक टप्प्यावर आणून ठेवले. मोदीजी, आपण फित कापून खुशाल श्रेय घ्यावे. कारण आमच्या शेतकरी बांधवांना, माय भगिनींना आता पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही, ह्यात आमचा खरा आनंद सामावलेला आहे.” अशी खोचक पोस्ट जयंत पाटील यांनी केली आहे.

हेही वाचा 

Back to top button