Baba Maharaj Satarkar passes away | ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन; ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास | पुढारी

Baba Maharaj Satarkar passes away | ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन; ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर (Baba Maharaj Satarkar) यांचे आज (दि.२६) निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराज सातारकर यांचा जन्म साताऱ्यात ५ फेब्रुवारी १९३६ रोजी झाला. त्यांच खरं नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असं होतं. त्यांनी इंग्रजी माध्यमातून दहावीपर्यंत शिक्षण केलं. त्यांच्या घरी शेकडो वर्षांपासून वारकरी सांप्रदायाची परंपरा आहे. त्यांचे वडिल ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्तम मृदूंग वाजवायचे. तर आई लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांनाही संत वाङ्मयाची  आवड होती.

Baba Maharaj Satarkar | उद्या अंत्यसंस्कार

वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांनी  आज (दि.२६) मुंबईतील नेरुळ येथे अखेरचा श्वास घेतला. ते ८९ व्या वर्षांचे होते. उद्या (दि.२७) संध्याकाळी ५ वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच पार्थिव आज (दि.२६) दुपारी तीन नंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखाना समोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदीरात ठेवण्यात येणार आहे.  फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांच्या पत्नी रूक्मिणी सातारकर ऊर्फ माई सातारकर यांचं निधन झालं होतं.

१३५ वर्षापासूनची वारकरी संप्रदायाची परंपरा 

बाबा महाराज सातारकर यांना १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. ते वयाच्या आठव्या वर्षांपासून बाबा महाराज श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणायचे. गेल्या 3 पिढ्यांपासून कीर्तनाची तसेच प्रवचनाची परंपरा पुढे सुरु ठेवली. ते चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांचे शिष्य. त्यांनी हजारो लोकांना वारकरी संप्रदायाची दिक्षा देत व्यसनमुक्त केले. त्याचबरोबर १९८३ साली  ‘श्री. चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्था’ स्थापना केली.

मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

बाबा महाराज सातारकर यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  आपल्या ‘X’ अकाउंटवर पोस्ट करत बाबा महाराज सातारकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,”किर्तनकलेचा खऱ्या अर्थाने परिपूर्ण आविष्कार, असंख्य भाविकभक्तांचे श्रद्धास्थान, भागवत धर्माचा वैश्विक राजदूत आणि आधुनिक काळातील माउली महावैष्णव तसेच वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू प.पू. गुरुवर्य श्री बाबा महाराज सातारकर यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायाची अपरिमित हानी झाली आहे. परमेश्वर श्री बाबा महाराज सातारकर यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो तसेच त्यांचे कुटुंबातील सदस्य आणि भाविकभक्तगणांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.”

हेही वाचा 

Back to top button