राज्याचं साखर उत्पादन 31 लाख टनांनी घटले | पुढारी

राज्याचं साखर उत्पादन 31 लाख टनांनी घटले

पुणे : राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम सोमवारी (दि.17) संपला असून, 210 साखर कारखान्यांनी 10 कोटी 54 लाख 75 हजार टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. 9.98 टक्के उतार्‍यानुसार 105 लाख 27 हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. 2021-22 च्या तुलनेत 2 कोटी 67 लाख टनांनी ऊस गाळप कमी झाले असून, 31.58 लाख टनांनी साखर उत्पादनात घट झाल्याचे साखर आयुक्तालयाच्या अहवालात नमूद केले आहे.

चालू वर्षात 18.41 लाख टनांइतके सर्वाधिक ऊस गाळप सोलापूरमधील विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखाना, तर सर्वाधिक 22 लाख क्विंटल इतक्या साखर उत्पादनासह कोल्हापूरमधील जवाहर सहकारी साखर कारखान्याने अव्वल स्थान पटकावले आहे. साखर उतार्‍यात कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील कारखान्यांचा डंका कायम असून, सर्वाधिक 12.86 टक्के उतार्‍यासह पंचगंगा सहकारी कारखान्याने राज्यात बाजी मारली आहे.

“हवामान बदलाचा फटका ऊस पिकास बसला असून, सरासरी हेक्टरी उत्पादकता 115 टनांवरून घटून 80 ते 85 टनांपर्यंत खाली आली आहे. खोडवा उसाच्या असलेल्या जादा प्रमाणामुळेही साखर उत्पादनात घट झाली आहे. महाराष्ट्रातील 105.27 लाख टन साखर उत्पादनासह देशात यंदाही प्रथम क्रमांक राहणार असून, उत्तर प्रदेशातील साखर उत्पादन 102 लाख टनांपर्यंतच होईल.   

                                              -शेखर गायकवाड, साखर आयुक्त, पुणे

ऊस गाळप हंगामाची वैशिष्ट्ये
(अ) सर्वाधिक ऊस गाळप करणारे
पहिले 5 साखर कारखाने (आकडे क्विंटलमध्ये)
विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखाना माढा-सोलापूर 18,41,421
गुरू कमॉडिटी-जरंडेश्वर शुगर -सातारा 18,18,421
जवाहर शेतकरी सहकारी हुपरी- कोल्हापूर 18,01,586
बारामती अ‍ॅग्रो लि., इंदापूर-पुणे 16,43,907
इंडिकॉन डेव्हलपर्स- श्री अंबिका शुगर्स-अहमदनगर 15,44,940

(ब) सर्वाधिक साखर उत्पादन घेणारे
पहिले 5 कारखाने (आकडे क्विंटलमध्ये)
जवाहर शेतकरी सहकारी-कोल्हापूर 22,07,070
गुरू कमॉडिटी-जरंडेश्वर-सातारा 18,26,500
विठ्ठलराव शिंदे सहकारी-सोलापूर 16,52,800
इंडिकॉन-श्री अंबिका शुगर्स -अहमदनगर 16,35,000
श्री तात्यासाहेब कोरे सहकारी-कोल्हापूर 14,72,010

(क) सर्वाधिक साखर उतारा मिळविणारे
पहिले 5 कारखाने (उतारा टक्क्यांत)
श्री पंचगंगा सहकारी-कोल्हापूर 12.86
राजाराम बापू पाटील सहकारी युनिट 3 – सांगली 12.84
राजाराम बापू पाटील वाटेगाव सुरुल – सांगली 12.80
कुंभी-कासारी सहकारी – कोल्हापूर 12.72
श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी – कोल्हापूर 12.62

सर्वाधिक दिवस हंगाम घेणारे पहिले 6 कारखाने

नॅचरल शुगर उस्मानाबाद (164 दिवस)
सागर सहकारी तथा कर्मयोगी अंकुशराव टोपे सहकारी
युनिट-2 तीर्थपुरी जालना (162 दिवस)
श्री सिद्धेश्वर सहकारी सोलापूर (160 दिवस)
श्री विघ्नहर सहकारी पुणे (158 दिवस)
श्री सोमेश्वर, पुणे (157 दिवस)
संत तुकाराम, पुणे (157 दिवस)

Back to top button