ई-बस डेपोला नाशिक जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचा विरोध | पुढारी

ई-बस डेपोला नाशिक जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचा विरोध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आडगावसह शहरातील इतर ठिकाणी ट्रक टर्मिनल विकसित करण्याच्या प्रश्नावर वारंवार पाठपुरावा करूनदेखील महापालिका प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नाशिक जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आडगाव ट्रक टर्मिनसलगत उभारण्यात येत असलेल्या महापालिकेच्या ई-बस डेपोला विरोध दर्शविला आहे. ई-बस डेपो इतरत्र हलवावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, इशारादेखील असोसिएशनने दिला आहे.

आडगाव ट्रक टर्मिनसच्या प्रश्नावर नाशिक जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि.२८) महापालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे संघटनेच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले.

आडगाव ट्रक टर्मिनसच्या सुविधांकडे दुर्लक्ष करत या ठिकाणी इलेक्ट्रिक बस डेपो उभारण्याचा घाट घातला जात आहे. यामुळे वाहतूकदारांमध्ये असंतोष पसरला आहे. शहराबाहेर १० किमी अंतरावर उभारण्यात येत असलेल्या ई-बस डेपोमुळे प्रत्येक बसला २० किमी अंतर अधिकचे कापावे लागणार आहे. यामुळे शहराबाहेर उभारण्यात येत असलेला हा डेपो व्यवहार्य ठरेल का याविषयी असोसिएशनने शंका उपस्थित केली आहे.

मार्च २०२३ मध्ये केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नाशिकमध्ये ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या कार्यक्रमात आडगाव ट्रक टर्मिनसह सर्व जकात नाक्यांच्या जागांवर ट्रक टर्मिनस विकसित करावे. तसेच शेतीमालासाठी व औद्योगिक मालासाठी लॉजिस्टिक पार्क उभारता येईल अशा सूचना मनपासह संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र अद्यापही त्यावर प्रशासनाकडून कुठलीही कार्यवाही झाल्याचे दिसत नाही. आडगावसह शहरात सर्व जकात नाक्यांवर निर्माण होणाऱ्या ट्रक टर्मिनस विश्रामगृह, स्वच्छ्तागृह, सुरक्षित वाहनतळ, भोजनालय, प्रशिक्षण केंद्र, व्यसनमुक्ती केंद्र, व्यायामशाळा, मनोरंजन केंद्र असे परिपूर्ण सोयी- सुविधा असलेले सारथी सुविधा केंद्र निर्माण व्हावे, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मंत्रीद्वयींना साकडे
असोसिएशनतर्फे पालकमंत्री दादा भुसे, मंत्री छगन भुजबळ, आमदार ॲड. राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे, सरोज अहिरे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनादेखील निवेदन पाठविण्यात आले आहे. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, कार्याध्यक्ष पी. एम. सैनी, सुभाष जांगडा, रामभाऊ सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button