निवडणूक येता घरा… महागाई येतसे प्रचारा! | पुढारी

निवडणूक येता घरा... महागाई येतसे प्रचारा!

सुनील कदम

निवडणूक कोणतीही असली तरी त्या निवडणुकीच्या प्रचारात महागाईचा मुद्दा नाही, असे होऊच शकत नाही, किंबहुना आधी महागाईचा प्रचार सुरू होतो आणि मग निवडणूक प्रचाराला सुरुवात होते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. प्रत्येक निवडणुकीच्या प्रचारात महागाईचा मुद्दा उपस्थित होत असला तरी महागाई मात्र कधीच कमी होताना दिसत नाही.

महागाईचा दर!

स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या काही वर्षात भारतातील महागाईचा दर केवळ 2 टक्के होता. त्यानंतर 1950 ते 60 या दशकात भारताने औद्योगिक क्रांतीवर भर दिल्यामुळे महागाईचा दर काहीसा वाढून 3 ते 7 टक्क्यांपर्यंत पोहोचला. 1960 च्या दशकात देशाच्या अनेक भागात हरितक्रांती झाल्यामुळे महागाईचा दर 6 टक्क्यांच्या आसपास होता. विशेष म्हणजे याच काळात 1962 साली भारत-चीन आणि 1965 साली भारत-पाकिस्तान अशी दोन युद्धे झाली. पण त्याचा परिणाम म्हणून देशात कुठेही महागाई वाढल्याचे उदाहरण नाही, याचे श्रेय अर्थातच देशातील हरितक्रांतीला द्यावे लागेल.! पण 1970 च्या दशकात मात्र महागाईचा आगडोंब उसळला.

महागाईचा आगडोंब!

1970 च्या दशकात सुरुवातीलाच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलांच्या दरांमध्ये तब्बल 250 टक्के वाढ झाली. साहजिकच त्याचा परिणाम होऊन देशांतर्गत सर्वच प्रकारचा माल आणि सेवांच्या किमतीत प्रचंड वाढ होऊन महागाईचा दर 20 वर जाऊन पोहोचला. देशातील जनतेमधून महागाईविरोधी पहिला सूर कोठून उमटला ,तर तो 1970 च्या दशकापासूनच! विरोधी पक्षांनीही या महागाईचे खापर अर्थातच तत्कालीन सत्ताधार्‍यांवर फोडायला वेळ लावला नाही. 1970 च्या दशकातच महागाई हा निवडणूक प्रचारातील एक मुद्दा म्हणून पुढे आला. 1970, 1980 आणि 1990 या तीन दशकात वेगवेगळ्या कारणांनी देशातील महागाईचा दर 13 ते 20 टक्क्यांच्या दरम्यान म्हणजेच उच्चतम पातळीवर राहिला. परिणामी, महागाईचा मुद्दा निवडणूक प्रचारातील ठळक मुद्दा म्हणून गणला जाऊ लागला.

प्रचाराचा मुद्दा!

त्यानंतरच्या कालावधीत देशातील महागाईचा दर हा सातत्त्याने सहा ते आठ टक्क्यांच्या आसपास राहिलेला आहे. त्यामुळे देशातील कोणत्याही निवडणुकीत महागाईचा मुद्दा हा विरोधकांच्या हाती प्रचाराचं कोलीत म्हणून कामी येऊ लागला. केवळ निवडणुकीतच नव्हे तर सभागृहातही महागाईच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्यासाठी विरोधकांना महागाई कामी येऊ लागली. आजपर्यंत देशात जेवढे मोर्चे निघाले, त्यापैकी सर्वाधिक मोर्चे हे महागाई या मुद्द्यावरच निघालेले असतील. अर्थातच 1970 च्या दशकापासून महागाई हा सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित मुद्दा बनला, तर हाच मुद्दा विरोधकांसाठी प्रचाराचा प्रभावी मुद्दा बनत गेला.

सरकारे आली-गेली!

महागाईचा मुद्दा इतका प्रभावशाली बनत गेला, की महागाईच्या मुद्द्यावरून अनेकवेळा सत्ताधार्‍यांना सरकार गमावण्याची तर विरोधकांना सरकार बनविण्याची संधी मिळत गेली. 2020 च्या दरम्यान देशातील महागाईचा दर 6 ते 7 टक्क्यांच्या आसपास असायचा. पण 2008 सालापासून देशातील महागाईने अचानक उसळी घेतली आणि महागाईचा दर 8 टक्क्यांपासून ते 12 टक्क्यांपर्यंत वाढत गेला. त्यामुळे 2014 च्या लोकसभा निवडणूक प्रचारातील महागाई हा सर्वात प्रभावी मुद्दा ठरला आणि याच मुद्द्यावरून देशातील काँग्रेस सरकार गेले. देशातील आणि राज्यभरातील अनेक सरकारांना या महागाईच्या मुद्द्याचा फटका बसत आलेला आहे, तर विरोधकांना सत्ताधारी बनण्याची संधी महागाईमुळे मिळत गेलेली आहे.

महागाई मात्र कायम!

1970 च्या दशकापासून देशात महागाई हा निवडणुकीतील प्रचाराचा एक प्रमुख मुद्दा बनत गेला. महागाईच्या मुद्द्यावरून सरकारे गेली, तशी वेगवेगळ्या पक्षांचे सरकार येतही गेले, पण देशातील महागाई काही कमी होताना दिसत नाही. आजही देशातील महागाईचा दर 5 ते 6 टक्क्यांच्या आसपासच आहे. मागील कित्येक निवडणुकीत महागाईच्या मुद्द्यावर मतदान करणार्‍या मतदारांची महागाईची ओरड काही कोणतेही सरकार आले-गेले तरी थांबलेली नाही.

गेल्या वीस वर्षांतील महागाईचे दर

2004-3.77 टक्के, 2005-4.25, 2006-5.80, 2007-6.37, 2008-8.35, 2009-10.88, 2010-11.99, 2011-8.86, 2012-9.31, 2013-10.91, 2014-6.35, 2015-5.87, 2016-4.84, 2017-2.49, 2018-4.86, 2019-7.66, 2020 ते 2024 – 5.10 ते 8 टक्क्यांच्या आसपास देशातील महागाईचे दर राहिलेले आहेत. पाच टक्क्यांच्या खाली महागाई जाताना दिसत नाही.

चित्रपटांवरही महागाईचा प्रभाव!

1970 च्या दशकात महागाई इतकी कळसाला पोहोचली होती की चित्रपटांवरही या महागाईचा प्रभाव पडला. 1974 साली आलेला मनोजकुमार यांचा ‘रोटी, कपडा और मकान’ या चित्रपटात देशातील महागाईवर भाष्य करण्यात आले होते. या चित्रपटातील ‘बाकी कुछ बचा तो महंगाई मार गयी,’ हे गीत विरोधकांसाठी प्रचारगीत म्हणून कामी आले होते. ठिकठिकाणच्या प्रचारसभांमधून हे गाणे वाजताना त्या काळात दिसून यायचे.

Back to top button