Mahayuti Seat Sharing : महायुतीच कुठं आडलं? फडणवीसांनी सांगितलं बैठकीत काय ठरलं? | पुढारी

Mahayuti Seat Sharing : महायुतीच कुठं आडलं? फडणवीसांनी सांगितलं बैठकीत काय ठरलं?

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यात बैठक झाली. या बैठकीत महायुतीच्या जागावाटपावर सहमती झाली असली तरी अजूनही काही जागांवर तिढा कायम असल्याची माहिती आहे. दरम्यान, जागांच्या संदर्भात दिल्लीत सकारात्मक चर्चा झाल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. (Mahayuti Seat Sharing)

महायुतीच्या जागावाटपाबाबत दिल्लीतील बैठकीनंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, “महाराष्ट्रातील जागांच्या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. ८० टक्के प्रश्न सुटले आहेत. उरलेल्या २० टक्के मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. आम्ही सर्व प्रश्न सोडवू आणि एक चांगली युती स्थापन करू,” असा विश्वात त्यांनी व्यक्त केला. (Mahayuti Seat Sharing)

मनसे आणि भाजपच्या भूमिकेत फरक नाही

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेवर बोलताना फडणवीस म्हणाले की, “मनसेने व्यापक भूमिका घेतली आहे, ही आमच्या भूमिकेपेक्षा वेगळी नाही. महाराष्ट्रात मराठी माणसाच्या हक्कांचे रक्षण झाले पाहिजे आणि त्यांनी व्यापक भूमिका बजावली पाहिजे. मनसेने मराठी माणसासोबतच हिंदुत्वावरही भाष्य केले आहे. त्यामुळे मनसे आणि भाजपच्या भूमिकेत फारसा फरक नाही. निवडणुकीचा विचार केला तर तो चर्चेचा विषय आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जातात,” असेही फडणवीस म्हणाले.

असं असेल जागावाटप

दिल्लीमधील बैठकीत महायुतीच्या जागावाटपावर सहमती झाली आहे. भाजपला ३४, शिंदेंच्या शिवसेनेला १० तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४ जागा दिल्या जातील. महायुतीमध्ये अजूनही १-२ जागांवर तिढा कायम आहे. त्यावर स्थानिक पातळीवर चर्चा करून हे प्रश्न सोडवावेत, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले असल्याचे वृत्त ‘पुढारी न्युजने’ दिले आहे. (Mahayuti Seat Sharing)

हेही वाचा : 

Back to top button