जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यास… ; माजी आमदार अनिल गोटे यांचा थेट इशारा | पुढारी

जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यास... ; माजी आमदार अनिल गोटे यांचा थेट इशारा

धुळे : पुढारी वृत्तसेवा- मराठा आरक्षणाच्या संदर्भात अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले असून सरकारने जरांगेंच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा महाराष्ट्राला फार मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी राज्य शासनाला दिला आहे.

मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असल्याने धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी राज्य शासनाला गंभीर इशारा देत असतानाच सूचना केल्या आहेत. यावर अंमलबजावणी न केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असे देखील त्यांनी खडे बोल सुनावले आहे.

जरांगे पाटलांनी आयोजित केलेल्या मुंबई मोर्चाचे वेळी ‘जरांगे पाटलांची फसवणूक करू नका’ असा स्पष्ट इशारा राज्य शासनाला मी दिला होता. पण शासनात बसलेल्या आरक्षण विरोधी विचाराने पिडीत नेत्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा अकारण प्रतिष्ठेचा केला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना त्यांनी धनगर आरक्षणावर महाराष्ट्रातील धनगरांची घोर फसवणुक केली. तो अनुभव लक्षात घेऊनच मी इशारा दिला होता की, ‘धनगरांची फसवणुक केली तशी जरांगेची करू नका’! आपली फसवणुक झाली, असे लक्षात आल्यानंतर होणारा उद्रेक शासनाला पेलवणारा असणार नाही, असा स्पष्ट इशाराही मी दिला होता. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपाच्या प्रभावाखाली असल्यामुळे ते पुनश्च एकदा भाजपच्या जाळ्यात फसले, अशी टीका गोटे यांनी केली.

महायुतीच्या सरकारवर जरांगेंनी विश्वास टाकल्यामुळे त्यांना पुनश्च उपोषणाला बसावे लागले. ही वस्तुस्थिती ते स्वतःही मान्य करतील. ‘शब्द पाळणे’ हे शब्द राजकीय नेत्यांच्या डिक्शनरीत बसत नाही. याची जरांगे यांना कल्पना नसल्यामुळेच त्यांना पुनश्च उपोषणाला बसावे लागले. आत्ताची लढाई ही ‘आर-पारची’ असेल याची कल्पना शासनाला यापुर्वीच यायला हवी होती. राज्यातील ५० टक्यांपेक्षा जास्त प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जनतेचा संबंध जरांगेंनी उपस्थित केलेल्या मराठा-कुणबी आरक्षणाच्या आंदोलनाशी निगडीत आहे.

काही दगा फटका झाल्यास भुतो न भविष्यती…..

जरांगे यांच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका, काही दगा फटका झाल्यास महाराष्ट्रातच नव्हे तर, सबंध देशात ‘न भुतो न भविष्यती’ अशी परिस्थिती निर्माण होईल. असा इशारा देखील अनिल गोटे यांनी दिला. तुमचे पक्ष बदल, बेडुकउड्या, राज्यसभा निवडणुका वगैरे विषय होत राहतील. जनतेच्या दृष्टीने निवडणुका अथवा पक्षबदल किंवा कुरघोड्यांचे राजकारण हे होत राहील, आम जनतेसाठी हे महत्वाचे नाही. पण प्राधान्याने जरांगेंच्या उपोषणाची गांभिर्याने दखल घेऊनच यावर तातडीने युध्दपातळीवर निर्णय करणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्हांला रडायला माणसे सापडणार नाहीत, याची जाणीव ठेवा. असा इशारा देऊन अनिल गोटे पुढे म्हणतात की, मराठा आंदोलनाच्या काळात, भाजपचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी हे तीन वेळा महाराष्ट्रात आले. पण एकदाही मराठा आंदोलनाबद्दल शब्दाने देखील उल्लेख केला नाही. भाजपाच्या शिर्षस्थ नेत्यांच्या दृष्टीने मराठा आंदोलन किंवा आरक्षण यांची दखल घेण्याची आवश्यकता नाही, हे काही शासनाच्या गांभिर्याचे लक्षण नाही, असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.

हेही वाचा :

Back to top button