भाजपने आदिवासी समुदायांना त्यांचा जमिनीचा हक्क का नाकारला? | पुढारी

भाजपने आदिवासी समुदायांना त्यांचा जमिनीचा हक्क का नाकारला?

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना काँग्रेसने पुन्हा एकदा काही प्रश्न विचारून पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान आज महाराष्ट्रातील नंदुरबार दौऱ्यावर होते. या पार्श्वभूमीवर आदिवासी समुदायांना जमिनीचा हक्क, शेतकरी आत्महत्या आणि वाढती बेरोजगारी याविषयीचे प्रश्न विचारून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर हल्ला चढवला.
लोकसभा निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नंदुरबार दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी भाजप उमेदवार डॉ. हिना गावित यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. दरम्यान काँग्रेसचे माध्यम सरचिटणीस जयराम रमेश यांनी एक्सद्वारे पंतप्रधानांना काही प्रश्न विचारले आहेत.

काय आहेत कॉंग्रेसचे प्रश्न:

१.  भाजपने आदिवासी समुदायांना त्यांचा जमिनीचा हक्क का नाकारला?
२.  महाराष्ट्रात दररोज ७  शेतकरी जीवन संपवत आहेत, त्यांचे  मृत्यू थांबविण्यासाठी भाजप सरकार काय करत आहे?
३.  महाराष्ट्रातील बेरोजगारीचा सामना करण्यात भाजप का अपयशी ठरला आहे?
दरम्यान, काँग्रेसने आदिवासी समुदायाला जमिनीचा हक्क देण्यासाठी केलेले काम तसेच देशात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार असताना केलेल्या विविध कामांचा दाखला देत भाजप सरकारने महाराष्ट्राच्या विविध भागांसाठी काही ठोस केले नसल्याचा दावा जयराम रमेश यांनी केला आहे. काँग्रेसने आणलेला वन हक्क कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी भाजपने मोठ्या प्रमाणात अडथळे आणले. कारण त्यांना तिथेही आपल्या कॉर्पोरेट मित्रांना प्रवेश द्यायचा आहे, असाही आरोप जयराम रमेश यांनी केला आहे.
सोबतच नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोचा हवाला देत बेरोजगारीमुळे दररोज दोन युवक महाराष्ट्रात जीवन संपवत आहेत. मात्र, सरकार त्यांच्यासाठीही ठोस पावले उचलत नाही, असेही जयराम रमेश म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकारवर आरोप करतानाच काँग्रेसचा जाहीरनामा असलेल्या ‘न्यायपत्रा’च्या माध्यमातून प्रश्न विचारलेल्या विविध विषयांवर काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास न्याय देणार असल्याचेही ते म्हणाले.
यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या विविध भागात दौऱ्यावर असताना त्या त्या भागातील समस्यांच्या संबंधित प्रश्न विचारून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना पुन्हा एकदा काँग्रेसने काही प्रश्न विचारले आहेत.

हेही वाचा

 

Back to top button