निवडणूक आयोगाने मल्लिकार्जुन खर्गेंना फटकारले | पुढारी

निवडणूक आयोगाने मल्लिकार्जुन खर्गेंना फटकारले

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यास विलंब होत असल्याबद्दल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केलेले सर्व आरोप केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळून लावले आहेत. खर्गे यांनी केलेले आरोप पूर्वग्रहदूषित आणि निराधार असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

मतदान संपताच मतदान केंद्रावर उपस्थित उमेदवारांची स्वाक्षरी घेऊन त्यांच्या समोरच दिवसभर झालेल्या मतदानाची आकडेवारी नोंदविली जाते. त्यामुळे मतदानाच्या आकडेवारीत कुठलाही घोळ घालणे शक्य नसल्याचे आयोगाने सांगितले. मात्र, तरीही खर्गे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित करून इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहिले आहे. खर्गे यांची ही कृती पूर्वग्रहदूषित असून त्यांनी लावलेले सर्व आरोप निराधार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या स्पष्टीकरणाविषयी काँग्रेसने असहमती दर्शवली आहे. निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था असून या संस्थेने निष्पक्षपणे आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोशल मीडियावरील एक्सवर केलेल्या पोस्टमधून दिली आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजाविषयी योग्य प्रश्न उपस्थित केले असून त्यावर चांगल्या प्रतिक्रिया उमटल्या असल्याचे रमेश यांनी म्हटले आहे.

हेही वाचा 

Back to top button