सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाने झोडपले | पुढारी

सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाने झोडपले

सिंधुदुर्ग ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पावसाने झोडपून काढले. धुवाँधार कोसळणार्‍या पावसाने सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांशी नद्यांना पूर आल्याने पूल, कॉजवे, रस्ते पाण्याखाली गेले होते. पुराचे पाणी आजूबाजूच्या परिसरात शिरल्याने सखल भागात जलमय स्थिती निर्माण झाली होती. प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्‍त माहितीनुसार जिल्ह्यात 15 ते 18 जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. या कालावधीत नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले आहे.

बुधवारी दिवसभर थांबून थांबून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. मुसळधार पावसामुळे भात लावणीची कामे खोळंबली आहेत. नदी-नाले दुथडी भरून वाहत असून बहुतांश नद्यांना पूर आल्याचे चित्र बुधवारी होते. मडुरा पंचक्रोशीतील सुमारे दहा एकरहून अधिक भातशेती पाण्याखाली गेली आहे.

अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.अनेक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला होता.दोडामार्ग ते वीजघर राज्यमार्गावरील साटेली-भेडशी येथील पूल गेले चार दिवस पाण्याखाली आहेत. जिल्ह्यातील मोठ्या नद्यांच्या पाण्याच्या पातळीतही कमालीची वाढ झाली होती. कुडाळ तालुक्यात भंगसाळ नदीच्या पुराचे पाणी शहरातील डॉ.आंबेडकरनगरातील लोकवस्तीपर्यंत दाखल झाले होते.

नद्यांच्या पुराचे पाणी नदीकाठच्या भागात शिरल्याने ठिकठिकाणची भातशेती पाण्याखाली गेली. तरव्याच्या पेंढ्या पाण्याबरोबर वाहून गेल्या. कर्ली नदीवरील आंबेरी पूल उशिरापर्यंत पाण्याखाली राहिल्यामुळे शिवापुरकडे जाणारी वाहतुक पूर्णतः खोळंबली होती.कणकवली,देवगड,मालवण,वैभववाडी,कुडाळ,दोडामार्ग,सावंतवाडी,वेंगुर्ले अशा जिल्ह्यातील सर्वच भागात बुधवारी मुसळधार पावसाने कहर केल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.पावसाने काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या.

मालवण तालुक्यात सर्वाधिक 157 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 157 मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 109.82 मि.मी पाऊस झाला असून 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 1696.31 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग-150(1755), सावंतवाडी-130(1886.10), वेंगुर्ले-131.60(1417.40), कुडाळ-90(1512), मालवण-157 (1920), कणकवली- 71(1784), देवगड – 65(1543), वैभववाडी – 84(1753) असा पाऊस झाला आहे.

Back to top button