मावळच्या इंद्रायणी भाताला सेंद्रिय पद्धतीमुळे मिळणार नवसंजीवनी ! | पुढारी

मावळच्या इंद्रायणी भाताला सेंद्रिय पद्धतीमुळे मिळणार नवसंजीवनी !

गणेश विनोदे

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील इंद्रायणी भाताचे उत्पादन सेंद्रिय पद्धतीने घेऊन गुणवत्तापूर्ण इंद्रायणी भात निर्मितीसाठी राज्य कृषी आयुक्तांपाठोपाठ राज्याच्या कृषिमंत्र्यांनी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याने मावळातील इंद्रायणी भाताला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इंद्रायणी भाताचे आगार असलेल्या मावळ तालुक्यात इंद्रायणी भाताला 18 ते 19 रुपये इतकाच भाव मिळत होता दरम्यान गतवर्षी सहकार महर्षी माऊली दाभाडे व आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने पुणे जिल्हा बँकच्या वतीने तालुक्यातील विविध सहकारी सोसायटी यांच्या माध्यमातून थेट शेतकर्‍यांकून भात खरेदी करण्याचा नवीन प्रकल्प सुरू करण्यात आला आणि या प्रकल्पामुळे इंद्रायणी भाताला आपोआपच दर वाढला.

आगामी हंगामात सेंद्रिय पद्धतीने भात पिकांचे उत्पादन घेऊन दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण इंद्रायणी भात तयार करण्याचा संकल्प सहकार महर्षी माऊली दाभाडे यांनी केला असून, त्या दृष्टीने कृषी खात्याच्या माध्यमातून मदत घेण्याचा प्रयत्नही केला जात आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच माऊली दाभाडे व आमदार शेळके यांनी राज्याचे कृषी आयुक्त यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली असता कृषी आयुक्त यांनी हा संकल्प पूर्ण करण्यासाठी कृषी खात्याच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी वडगाव मावळ येथे मावळ फेस्टिवल सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी मावळ तालुक्यातील इंद्रायणी भाताच्या सेंद्रिय पद्धतीने घेण्यात येणार्‍या उत्पादनाला कृषी विभागाच्या माध्यमातून आवश्यक असलेल्या निधीसह सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे भविष्यात मावळातील इंद्रायणी भाताला सेंद्रिय पद्धतीचा उत्पादनामुळे नवसंजीवनी मिळण्यास प्रोत्साहन मिळत आहे.

मावळ तालुका इंद्रायणी भाताची निर्यात करणारे जागतिक केंद्र बनेल !
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मावळ फेस्टिव्हलच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना, मावळातील शेतकर्‍यांनी सेंद्रिय इंद्रायणी भात असा तयार करा की, जगभरात मागणी झाली पाहिजे व शेतकर्‍याच्या जीवनात अर्थिक क्रांती झाली पाहिजे. भविष्यात मावळ तालुका जगाच्या पाठीवर इंद्रायणी भाताची निर्यात करणारे जागतिक केंद्र बनेल असा विश्वास व्यक्त केला.

आमदार शेळकेंनी मागितले आणि  कृषिमंत्री मुंडेंनी जाहीर केले
मावळ फेस्टीव्हल उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार सुनील शेळके यांनी सेंद्रिय भात उत्पादनाबाबत माहिती देऊन यासाठी आवश्यक असणार्‍या शीतगृहासाठी 15 कोटींचा निधी द्यावा असे आवाहन कृषी मंत्र्यांना केले. यावर बोलताना कृषिमंत्री मुंडे यांनी लगेचच फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करा, मी लगेच 5 कोटींचा निधी देतो असे सांगून शीतगृहासाठीही आवश्यक असेल तितका निधी देतो असे जाहीर केले.

Back to top button