तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेला सहकाराचे बळ : बी. एल. वर्मा | पुढारी

तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेला सहकाराचे बळ : बी. एल. वर्मा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भारत सध्या जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून, पुढील पाच वर्षांत भारत जगातली तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येईल. या यशात देशाच्या अर्थव्यवस्थेला सहकार क्षेत्राचे सर्वाधिक बळ मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांनी केले. देशात सहकार क्षेत्राच्या माध्यमातून विकास घडवून आणण्यासाठी अनेक सकारात्मक पावले उचलली जात असून, महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक ते सहकार्य केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह येथे नाशिक जिल्हा सहकारी बँक्स असोसिएशनतर्फे आयोजित दोनदिवसीय महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक्स परिषद २०२३-२४ च्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा परिषदेच्या स्वागताध्यक्षा डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, सहकार आयुक्त अनिल कवळ, सहकार परिषदेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर आदी उपस्थित होते.

वर्मा म्हणाले, ‘देशातील कोट्यवधी वंचित, दलित, शेतकरी यांच्या विकासासाठी सहकार क्षेत्र कार्यरत आहे. देशातील दुर्लभ तसेच सीमावर्ती भागाच्या विकासातही सहकार क्षेत्राचे योगदान आहे. तब्बल ३,७७८ सीमावर्ती गावांमध्ये सुविधा उपलब्ध करून दिल्याचे काम सहकार क्षेत्र करीत आहे. सहकारातून समृद्धी घडवून आणण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने स्वतंत्र सहकार विभागाची निर्मिती केली आहे. त्यातून देशात सहकारी बँकांचे जाळे विस्तारण्याची गरज आहे. या बँकांच्या माध्यमातून देशातील गोरगरिबांना सेवा देण्याचा प्रयत्न व्हायला हवा, असेही त्यांनी याप्रसंगी नमूद केले.

जिल्हा बँकप्रश्नी तोडगा काढणार

जिल्हा बँकप्रश्नी केंद्र आणि राज्य सरकार मिळून तोडगा काढला जाणार आहे. तसेच राज्यातील सहकार विभागाला येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. राज्यातील सहकार संस्थांना निश्चितपणे काही अडचणी भेडसावत आहेत. त्या दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. सहकार विभागाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांसमवेत स्वतंत्र बैठक घेतली जाणार आहे. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यातील सहकार क्षेत्राचे प्रश्न घेऊन दिल्लीत यावे. त्यांच्यासोबत स्वतंत्र बैठक घेऊन हे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही केंद्रीय राज्यमंत्री वर्मा यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा:

Back to top button