शिक्षण : चिंता शैक्षणिक आरोग्याची

शिक्षण : चिंता शैक्षणिक आरोग्याची
Published on
Updated on

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 'प्रथम' फाऊंडेशन संस्थेच्या वतीने 'अ‍ॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट' अर्थात 'असर' अहवाल प्रकाशित करण्यात आला. या अहवालानुसार देशातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आरोग्य बिघडले असल्याचे चित्र समोर आले. पायाभूत क्षमतांमध्ये विद्यार्थी मागे असतील, तर त्यांचा पुढील शैक्षणिक प्रवास धोक्याचा मानायला हवा. आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना या सर्वेक्षणात भागाकाराचे गणित आलेले नाही, हे जर खरे मानले; तर हे विद्यार्थी उच्च प्राथमिक स्तरावर पुढच्या वर्गात गेले आहेत ते कोणत्या गुणवत्तेच्या आधारे, याचाही विचार करायला हवा.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 'प्रथम' फाऊंडेशन संस्थेच्या वतीने 'अ‍ॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट' अर्थात 'असर' अहवाल प्रकाशित करण्यात आला. या अहवालानुसार देशातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आरोग्य बिघडले असल्याचे चित्र समोर आले. गेल्या काही वर्षांत विविध सर्वेक्षणात देशातील शिक्षणाचे चित्र कमी-अधिक प्रमाणात सारखेच रेखाटले गेले आहे. यावर्षीच्या 'असर' अहवालासाठीच्या नमुना निवडीत चौदा ते अठरा वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला होता. साधारण हा वयोगट माध्यमिक स्तरावरील आहे. या स्तरावरील 68 टक्के विद्यार्थ्यांना भागाकार करता येत नाही. सुमारे 25 टक्के विद्यार्थ्यांना दुसरीच्या स्तरावरील भाषिक उतारा वाचता आलेला नाही. पायाभूत क्षमतांमध्ये विद्यार्थी मागे असतील, तर त्यांचा पुढील शैक्षणिक प्रवास धोक्याचा मानायला हवा. अर्थात, ही आकडेवारी म्हणजे संपूर्ण देशाचे चित्र नाही. मात्र, तरीसुद्धा या सर्वेक्षणाच्या माध्यमातून जे चित्र समोर आले आहे, त्याचे गांभीर्यदेखील लक्षात घ्यायला हवे.

यावर्षी देशातील 26 राज्यांमधील 28 जिल्ह्यांतील 52 हजार 227 कुटुंबातील 34 हजार 745 विद्यार्थ्यांचा सर्व्हेमध्ये समावेश करण्यात आला आहे. यात मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील प्रत्येकी दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. आपल्या राज्यातील नांदेड जिल्ह्याची या सर्वेक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 1 हजार 374 विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवला गेला आहे. महाराष्ट्रातील 61 गावे आणि 1200 कुटुंबांचा विचार करण्यात आला आहे. महाराष्ट्राचा विचार करता नांदेडची लोकसंख्या तीन टक्के इतकी आहे. या सर्वेक्षणासाठी प्रत्येक राज्याच्या प्रादेशिक भाषेतील वाचन क्षमतांचा विचार करण्यात आला आहे. इंग्रजी व गणित विषयाचे ज्ञान, मूलभूत कौशल्ये व त्याचा रोजच्या जीवनातील उपयोजन क्षमता, रोजच्या जीवन व्यवहारातील सूचना फलकांचे वाचन व त्याचे आकलन, आर्थिक आकडेमोड व त्याची समज व तसेच स्मार्टफोनचा वापर यासारख्या काही घटकांचा विचार केला गेला आहे. हे सर्वेक्षण पूर्णतः पायाभूत स्वरूपाचे आहे.

सर्वेक्षणातील निष्कर्षांचा विचार करता काही गोष्टी निश्चित विचार करण्यास भाग पाडणार्‍या आहेत. देशातील 26 राज्यांतील विद्यार्थ्यांच्या वाचन कौशल्यांचा विचार करता या वयोगटातील विद्यार्थ्यांना त्या-त्या राज्यातील प्रादेशिक भाषेतील आणि इयत्ता दुसरीच्या स्तरावरील उतारा वाचनासाठी देण्यात आला होता. खरेतर जेव्हा साधारण वाचन कौशल्य विद्यार्थ्यांना प्राप्त नसते, तेव्हा विद्यार्थ्यांचा लेखन कौशल्याचा प्रवासही कठीणच असतो. वाचन, लेखन कौशल्य प्राप्त नाही म्हटल्यावर विद्यार्थ्यांचा इतर विषय शिकण्याचा प्रवासदेखील अवघड होत जातो. अभ्यासकांच्या मते, कोणताही विषय शिकायचा असेल, त्याचे आकलन करून घ्यायचे असेल, तर विद्यार्थ्यांना किमान भाषा विषयाची कौशल्ये अधिक उत्तम यायला हवीत. मात्र, येथील सर्वेक्षणात राष्ट्रीय स्तरावर 26.4 टक्के विद्यार्थ्यांना पायाभूत स्तरावरील वाचन करता आलेले नाही. महाराष्ट्राचा विचार करता वाचन करता न येणारी विद्यार्थीसंख्या 21 टक्के इतकी आहे. याचा अर्थ या विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रक्रियेत अधिक अडथळे आहेत. मातृभाषा वाचता येत नाही आणि तेही अगदी दुसरीच्या स्तरावरील, याचा विचार करण्याची गरज आहे. भाषा शिक्षणाचा प्रवास घडत नसेल, तर कोणत्याच विषयाची आकलनाची प्रक्रिया घडत नाही. भाषेचे आकलन किती, यावर इतर विषयाचे आकलन अवलंबून असते. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक भवितव्याचा पाया अधिक कच्चा राहणार, हे निश्चित.

भाषेबाबत परिस्थिती चिंताजनक असली, तरी त्यापेक्षा गणिताची परिस्थिती अधिक गंभीर आहे. देशातील सुमारे 57 टक्के विद्यार्थ्यांना भागाकाराची प्रक्रिया करता आलेली नाही. 45 टक्के विद्यार्थी भागाकार करू शकले, तर 42 टक्के विद्यार्थिनी भागाकाराचे गणित सोडवू शकल्या आहेत. गणित विषयाच्या अभ्यासक्रमात चार मूलभूत संख्यांवरील क्रियांचा विचार करण्यात आला आहे. या सर्व संख्यांवरील क्रिया कौशल्य साधारण प्राथमिक स्तरावरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. पहिली ते चौथीच्या वर्गात संख्यांवरील क्रियांचा अभ्यासक्रमात समावेश आहे. असे असताना आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना या सर्वेक्षणात भागाकाराचे गणित आलेले नाही हे जर खरे मानले, तर हे विद्यार्थी उच्च प्राथमिक स्तरावर पुढच्या वर्गात गेले आहेत ते कोणत्या गुणवत्तेच्या आधारे, याचाही विचार करायला हवा. गणितातील साधारण पायाभूत स्वरूपाच्या क्रिया येत नाही म्हटल्यावर, त्यावर आधारित असलेल्या पुढील टप्प्याचे गणित कसे येणार, हा प्रश्न आहे.

इंग्रजी विषयाचा विचार करता 57.3 टक्के विद्यार्थी वाचनासाठी देण्यात आलेले इंग्रजी वाक्य वाचू शकले. मात्र, वाचता येणार्‍यांपैकी 73.5 टक्के विद्यार्थ्यांना वाचलेल्या वाक्याचे आकलन होऊ शकलेले नाही. केवळ अक्षर साक्षरतेपुरता हा विचार दिसतो आहे. वाचता आलेले पण अर्थ न समजणे हे वाचन कसे? जगभरात अर्थपूर्णरीतीने वाचता येणे म्हणजे वाचन कौशल्य, असे समजले जाते. याचा अर्थ देशातील तरुणाईला इंग्रजी भाषेचे वाचन कौशल्य प्राप्त नसण्याचे प्रमाण अधिक आहे. साधारण देशातील पायाभूत साक्षरता म्हणून देखील विचार केला, तर ती प्राप्त नसल्याचे प्रमाणदेखील अधिक आहे. हे विद्यार्थी कौशल्य प्राप्त नसतानादेखील पुढच्या वर्गात गेले आहेत. त्यामुळे किमान प्राथमिक स्तरावर शिक्षण हक्क कायद्याचा आधार घेत विद्यार्थी पुढच्या वर्गात घातले गेले, असा निष्कर्ष काढला जाईल.

आता हे विद्यार्थी माध्यमिक स्तरावर तरी कसे पोहोचले याचा विचार करण्याची गरज आहे. विषयांची पायाभूत क्षमता, कौशल्य प्राप्त नसतानादेखील हे विद्यार्थी पुढच्या स्तरावर जात असतील, तर मूल्यमापन प्रक्रियेचा पुनर्विचार करण्याची गरज अभ्यासक व्यक्त करू लागले आहेत. मूल्यमापन प्रक्रिया अधिकाधिक वस्तुनिष्ठ आणि विश्वासार्ह प्रक्रियेची गरज आहे. विद्यार्थ्यांचा व्यावसायिक अभ्यासक्रमाकडील कलही फारसा सकारात्मक नाही. ही संख्या 5.6 टक्क्यांच्या आसपास जाते आहे. याचा अर्थ आपल्या शिक्षण व्यवस्थेतून नोकरीच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या मानसिकतेची पेरणी होत असल्याची बाबही गंभीर आहे. इतक्या सार्‍या विद्यार्थ्यांची मानसिकता नोकरीचीच अशीच उंचावत गेली, तर उद्या देशात बेकारीचे हात अधिक उंचावण्याची शक्यता अधिक आहे.

देशात डिजिटल साक्षरतेचा टक्का वाढतो आहे. जगाच्या पाठीवर अधिक आंतरजाल व समाजमाध्यमांचा वापर भारतात केला जातो आहे. या सर्वेक्षणानुसार देशात सुमारे 90 टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. 90.5 टक्के विद्यार्थी समाजमाध्यमांचा वापर करतात. समाजमाध्यमांच्या संदर्भाने अपेक्षित असलेल्या सुरक्षेसंदर्भातील ज्ञान माहीत असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वापरणार्‍या विद्यार्थ्यांपैकी पन्नास टक्के आहे. ही बाब काहीशी सकारात्मक म्हणायला हवी. हाती स्मार्टफोन असताना त्याचा उपयोग शिकण्यासाठी करण्याची गरज असताना सर्वेक्षणात मात्र 80 टक्के विद्यार्थी या स्मार्टफोनचा उपयोग केवळ मनोरंजनासाठी करत असल्याचे समोर आले आहे. अर्थात, चित्रपट पाहणे आणि गाणी ऐकण्यासाठी त्याचा अधिकाधिक वापर होत आहे.

सध्या जगाच्या पाठीवर भारतीयांचा स्क्रीन टाईम हा सर्वाधिक आहे. साधारण तो आठ ते दहा तास असल्याचे सांगितले जात आहे. समाजमाध्यमांचा अधिकाधिक उपयोग होत असल्याने विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. समाजमाध्यमात गुंतून पडल्यानंतर अधिक वेळ विद्यार्थ्यांचा तेथे जात असल्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष होते आहे का? याचाही विचार करण्याची गरज आहे. कोरोनाच्या काळात शिक्षण सुरू ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या हाती मोबाईल देण्यात आले. शाळा आणि शासनाने त्यासाठी भूमिका घेतली. त्यातून शिकण्यास आरंभी मदत झाली, मात्र त्यानंतर हाती देण्यात आलेले मोबाईल विद्यार्थ्यांच्या हाती कायम राहिले.

आता त्याचे दुष्परिणाम होता आहेत का? याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांचा स्क्रीनटाईम वाढत असल्याने त्याचा विद्यार्थ्यांच्या आकलनावर विपरीत परिणाम होत असल्याचे अभ्यासक मांडणी करू लागले आहेत. त्यामुळे एकूणच शिक्षणाच्या आरोग्यावर होत असलेला परिणाम अधिक गंभीर आहे, हेही लक्षात घ्यायला हवे. अर्थात, अहवालात दर्शित करण्यात आलेले परिणाम म्हणजे समग्र देशाचे चित्र नाही. मात्र, यातून आपल्या शैक्षणिक प्रवासाची दिशा काहीशी अधोरेखित होते आहे का? हेही पडताळून पाहायला हवे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news