पर्सिव्हरन्स रोव्हरला मिळाले मंगळावरील जीवसृष्टीचे संकेत?

पर्सिव्हरन्स रोव्हरला मिळाले मंगळावरील जीवसृष्टीचे संकेत?

वॉशिंग्टन : 'नासा'च्या पर्सिव्हरन्स रोव्हरला आढळले की मंगळभूमीवरील जेझेरो क्रेटर या नावाने ओळखल्या जाणार्‍या विवरातील एक ठिकाण पाण्याने भरलेले होते. या ठिकाणी रोव्हरला यापूर्वीच प्राचीन काळातील जीवसृष्टीचे जीवाश्म सापडले असावे असे संशोधकांना वाटते.

हे रोव्हर फेब्रुवारी 2021 मध्ये विवरात पहिल्यांदा उतरले होते. त्यावेळी त्याच्यासमवेत आता निवृत्त करण्यात आलेले इंजिन्युटी नावाचे छोटे हेलिकॉप्टरही होते. या रोव्हरने  जेझेरो क्रेटरमध्ये ग्राऊंड-पेनिट्रेटिंग रडार म्हणजेच जमिनीच्या स्तराखाली जाणार्‍या रडारच्या सहाय्याने हे संशोधन केले. एकेकाळी याठिकाणी सरोवर होते आणि नंतर ते कोरडे पडले. या जेझेरो क्रेटरमधून पर्सिव्हरन्सने खडक-मातीचे काही नमुनेही गोळा केले आहेत. ते ज्यावेळी पृथ्वीवर आणले जातील त्यावेळी त्यांच्या अभ्यासातून मंगळावर एके काळी असलेल्या जीवसृष्टीचे पुरावे सापडतील. याबाबतच्या संशोधनाची माहिती 'सायन्स अ‍ॅडव्हान्सेस' या नियतकालिकात देण्यात आली आहे.

पर्सिव्हरन्स रोव्हरची कामगिरी

संशोधक डेव्हीड पेज यांनी सांगितले की मंगळाच्या कक्षेतून आपण केवळ वेगवेगळे ढिगारे पाहू शकतो. मात्र, त्यापैकी कोणती रचना तिच्या मूळ स्वरूपात आहे हे समजत नाही. त्यांचा भूगर्भीय इतिहासही वरून समजत नाही. त्यासाठी जमिनीखाली काय आहे हे पाहावे लागते. 'नासा'ने त्यासाठीच 2.7 अब्ज डॉलर्सची 'मार्स 2020' मोहीम सुरू केली होती. पर्सिव्हरन्स रोव्हर ज्या वेळेपासून मंगळावर आले त्यावेळेपासूनच आधीच्या क्युरिऑसिटी रोव्हरच्या साथीने बरेच महत्त्वाचे संशोधन झाले आहे.

जेझेरो क्रेटरच्या 48 किलोमीटरच्या भागात प्राचीन काळातील जीवसृष्टीचे पुरावे शोधण्यासाठी पर्सिव्हरन्सने मोठी कामगिरी केली आहे. तीन वर्षे या रोव्हरसह इंजिन्युटी हेलिकॉप्टर होते. त्याने 18 जानेवारीला आपले 72 वे आणि अखेरचे उड्डाण केले. एखाद्या मोटारीच्या आकाराच्या पर्सिव्हरन्स रोव्हरवर सात वैज्ञानिक उपकरणे आहेत. त्यामध्येच रडार इमेजरचाही समावेश आहे. ते दर 4 इंचांवर जमिनीत रडार पिंग्ज पाठवते. त्यामधून पृष्ठभागापासून 20 मीटर खोलीवरील स्थितीचीही माहिती समजते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news