स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणी विभव कुमारांवर गुन्हा दाखल

स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणी विभव कुमारांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणी विभव कुमार यांच्यावर गुरुवारी (१६ मे) दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक विभव कुमार यांनी गैरवर्तन केल्याची तक्रार मालीवाल यांनी दाखल केली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली. विभव कुमार विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणात स्वाती मालीवाल यांनी अरविंद केजरीवालांचे नाव घेतले नसल्याचे स्पष्ट झाले.

दिल्लीच्या मुख्यमंत्री सदनात राज्यसभा खासदार आणि आपच्या नेत्या स्वाती मालीवाल यांना मारहाण झाल्याचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी दिल्ली पोलिसांनी मालीवाल यांचा जबाब नोंदवला. त्यानुसार विभव कुमार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी दिल्ली पोलीस स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले आणि सुमारे चार तासांनंतर त्यांच्या घरातून परतले. यादरम्यान स्वाती मालीवाल यांनी दिल्ली पोलिसांसमोर आपल्यासोबत झालेल्या गैरवर्तणुकीबाबत जबाब नोंदवला. आपल्या निवेदनात त्यांनी १३ मे रोजी घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती दिली. मात्र, त्यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे नाव नाही.

दरम्यान, स्वाती मालीवाल यांनी गैरवर्तन प्रकरणानंतर मौन बाळगले होते. परंतु पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर त्यांनी 'एक्स'वर पोस्ट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. मालीवाल यांनी पोस्टमध्ये म्हणले आहे की, " माझ्यासोबत जे घडलं ते खूप वाईट होतं. गेलेले दिवस माझ्यासाठी खूप कठीण गेले. देशात महत्त्वाच्या निवडणुका सुरू आहेत, स्वाती मालीवाल महत्त्वाच्या नाहीत, देशाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत.भाजपवाल्यांना विशेष विनंती आहे की या घटनेवर राजकारण करू नका." अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news