भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रायपूरला आज चौथा टी-२० सामना; मालिका विजयाचे भवितव्य गोलंदाजांच्या हाती | पुढारी

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रायपूरला आज चौथा टी-२० सामना; मालिका विजयाचे भवितव्य गोलंदाजांच्या हाती

रायपूर : वृत्तसंस्था भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना रायपूरमध्ये आज (शुक्रवारी) होत असून, ग्लेन मॅक्सवेलच्या अनुपस्थितीत भारताच्या युवा गोलंदाजांना डेथ ओव्हर्समध्ये चांगली कामगिरी करून भारताला मालिका विजय मिळवून देण्याची चांगली संधी आहे. या सामन्यात दोन्ही संघामध्ये मोठ्या प्रमाणात बदल पाहण्यास मिळू शकतो.

या मालिकेत भारतीय संघ आधीच २-१ ने पुढे आहे. टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे. पण भारताची गोलंदाजीची दुसरी फळी तिसऱ्या टी-२० सामन्यात शेवटच्या दोन षटकांत ४० हून अधिक धावा दिल्या. यात सर्वात महागडा ठरला तो प्रसिद्ध कृष्णा. त्याने आपल्या ४ षटकांत ६८ धावा दिल्या. त्यामुळे आता नव्याने संघात दाखल झालेल्या दीपक चहरला त्याच्या जागी संधी मिळू शकते. नवा चेंडू स्विंग करण्यात तो कृष्णापेक्षा जास्त सरस आहे. याशिवाय लग्नासाठी रजेवर गेलेल्या मुकेश कुमारलाही चौथ्या सामन्यात स्थान मिळेल, त्यामुळे आवेश खान बाहेर जाईल.

भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर चौथ्या टी-२० सामन्यातून टीम इंडियात परतणार आहे. त्याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तो प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे, अशा स्थितीत खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या तिलक वर्माला प्लेईंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.

मैदानावरील पहिलाच टी-२० सामना रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह स्टेडियममध्ये अद्याप एकही टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला नाही. येथे पहिल्यांदाच टी-२० सामना आयोजित केला जाणार आहे.

रायपूरच्या मैदानावर आतापर्यंत फक्तएक वन डे सामना खेळला गेला आहे. त्या सामन्यात भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडचा संघ १०८ धावांत ऑल आऊट झाला होता. यानंतर टीम इंडियाने २ विकेटस् राखून हे लक्ष्य सहज गाठले. या मैदानावर आयपीएल आणि चॅम्पियन्स टी-२० लीगचे अनेक सामने खेळले गेले आहेत.

कशी असेल खेळपट्टी

रायपूरच्या मैदानावर ६ आयपीएल सामने आणि ८ चॅम्पियन्स टी-२० लीग सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये फक्त एकदाच असे घडले आहे की एखाद्या संघाने २०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्यामुळे गोलंदाजांना खेळपट्टीची मदत मिळेल, अशी पूर्ण आशा आहे. दुसऱ्या डावात ही खेळपट्टी संथ होते, त्यामुळे या खेळपट्टीवरून फिरकीपटूंना मदत मिळते; पण पाठलाग करणाऱ्या संघाला थोडे सोपे होऊ शकते, कारण नंतर दव येते आणि गोलंदाजी करणे कठीण होते. त्यामुळे नाणेफेकीची भूमिका महत्त्वाची ठरते.

हेही वाचा : 

Back to top button