Bengaluru Schools get bomb threat emails | बंगळूरमधील १५ हून अधिक शाळांना बॉम्बच्या धमकीचे ईमेल | पुढारी

Bengaluru Schools get bomb threat emails | बंगळूरमधील १५ हून अधिक शाळांना बॉम्बच्या धमकीचे ईमेल

पुढारी ऑनलाईन डेस्क: बंगळूरमधील १५ हून अधिक शाळांना शुक्रवारी (दि.१) निनावी ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहे. हा मेल मिळाल्यानंतर शाळातील विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थी, पालक आणि शाळा अधिकाऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. लक्ष्यित शाळांपैकी एक शाळा कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या निवासस्थानासमोर आहे, असे ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. (Bengaluru Schools get bomb threat emails)

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे, ते माध्यमांशी बोलताना म्हणाले, मी टीव्ही पाहत होतो. माझ्या घरासमोरील शाळेलाही बॉम्बच्या धमकीचा ईमेल आला. त्यानंतर मी तात्काळ याठिकाणी आलो असल्याचे पत्रकारांना शिवकुमार यांनी सांगितले. (Bengaluru schools)

बंगळूरमधील अनेक शैक्षणिक संस्थांना ईमेलद्वारे अशाच बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. यानंतर बंगळूर पोलिसांनी सुरक्षिततेची खबरदारी म्हणून, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना शाळांमधून बाहेर काढले आहे.  दरम्यान पोलिसांनकडून धमकीचा ईमेल आलेल्या शाळांमध्ये तपास केला जात आहे, असेही इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. (Bengaluru schools)

बॉम्बच्या धमक्या फसव्या असण्याचे संकेत असूनही, पोलिसांनी बॉम्ब निकामी पथकांच्या मदतीने परिसराची कसून झडती घेतली आहे. त्यांनी अद्याप कोणत्याही शाळेत बॉम्ब असल्याची पुष्टी केलेली नाही, असेही बंगळूर पोलिसांनी म्हटले आहे. बंगळूर पोलिस आयुक्तांनी X वर (पूर्वीचे ट्विटर) एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “बंगळूर शहरातील काही शाळांना आज (दि.१) सकाळी शाळेत ‘बॉम्ब असलेले ईमेल प्राप्त झाले. याची पडताळणी करण्यासाठी बॉम्ब शोधक पथके तैनात करण्यात आली असून. कसून तपास केला जात आहे. परंतु प्रथमदर्शनी हे ईमेल फसवे असल्याचे वाटतात. तरीही यातील दोषींना शोधण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील, असेही पोलिसांनी म्हटले आहे. तसेच गेल्या वर्षी बंगळूरमधील अनेक खाजगी शाळांना अशाच प्रकारच्या ईमेल धमक्या आल्या, परंतु त्या सर्व फसव्या ठरल्या, असेही बंगळूर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

Back to top button