BSE Market Capitalisation | भारतीय शेअर बाजाराने इतिहास रचला, BSE मार्केट कॅपने ओलांडला ४ ट्रिलियन डॉलरचा टप्पा | पुढारी

BSE Market Capitalisation | भारतीय शेअर बाजाराने इतिहास रचला, BSE मार्केट कॅपने ओलांडला ४ ट्रिलियन डॉलरचा टप्पा

पुढारी ऑनलाईन : जागतिक सकारात्मक संकेतांमुळे आज बुधवारी (दि.२९) भारतीय शेअर बाजाराने मोठी उसळी घेतली. सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्स ४०० अंकांनी वाढून ६६,५९१ वर पोहोचला. तर निफ्टीने ११३ अंकांच्या वाढीसह २० हजारांचा टप्पा पार केला. निफ्टी सप्टेंबर २०२३ नंतर पहिल्यांदाच २० हजारांवर गेला.

दरम्यान, बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलाने पहिल्यांदाच विक्रमी ४ ट्रिलियन डॉलरचा ($4 trillion) टप्पा ओलांडला आहे. मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, २९ नोव्हेंबरपर्यंत सर्व बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल (market capitalisation) ४.०१ ट्रिलियन डॉलर म्हणजेच सुमारे ३३३ ट्रिलियन रुपयांवर गेले आहे. जे वर्षाच्या सुरूवातीपासून सुमारे ६०० अब्ज डॉलरने वाढले आहे. दरम्यान, सेन्सेक्स १५ सप्टेंबरच्या विक्रमी उच्चांकाच्या जवळपास २ टक्क्याच्या खाली आहे. (BSE Market Capitalisation)

संबंधित बातम्या 

बीएसई सूचीबद्ध कंपन्यांनी मे २००७ मध्ये १ ट्रिलियन डॉलर बाजार भांडवलाचा टप्पा गाठला होता. अनेक नवीन कंपन्या निर्देशांकात सामील होऊनही ते दुप्पट होण्यासाठी १० वर्षे लागली. त्यानंतर बाजार भांडवल जुलै २०१७ मध्ये २ ट्रिलियन डॉलर आणि मे २०२१ मध्ये ३ ट्रिलियन डॉलरच्या पुढे गेले.

जागतिक बाजारांवर नजर टाकल्यास भारतीय शेअर बाजार मूल्याच्या दृष्टीने पाचव्या स्थानी आहे. सर्वाधिक बाजार भांडवलात अमेरिका (४७ ट्रिलियन डॉलर), चीन (९.७ ट्रिलियन डॉलर), जपान (५.९ ट्रिलियन डॉलर) आणि हाँगकाँग (४.८ ट्रिलियन डॉलर) नंतर भारतीय शेअर बाजाराचा नंबर लागतो.

विशेषतः एचडीएफसी बँक, इन्फोसिस आणि रिलायन्स या हेवीवेट शेअर्समधील तेजीमुळे आजच्या बाजारातील वाढीला सपोर्ट मिळाला आहे. यूएस फेडरल रिझर्व्हच्या अधिकाऱ्यांनी मार्च २०२४ च्या सुरुवातीला व्याजदर कपात होणार असल्याचा अंदाज व्यक्त केल्यानंतर बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. (BSE Market Capitalisation)

सेन्सेक्सवर एम अँड एम, विप्रो, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, ॲक्सिस बँक, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक हे शेअर्स टॉप गेनर्स होते. टाटा स्टील, इन्फोसिस, टीसीएस, जेएसडब्ल्यू स्टील, सन फार्मा हे शेअर्सही वाढले आहे. केवळ एनटीपीसीचा शेअर किरकोळ घसरला आहे. (BSE Market Capitalisation)

Back to top button