गुंतवणूक : ‘कमोडीटी’त जिर्‍याला महागाईची फोडणी! किंमत १५० टक्क्यांनी वाढली | पुढारी

गुंतवणूक : ‘कमोडीटी’त जिर्‍याला महागाईची फोडणी! किंमत १५० टक्क्यांनी वाढली

अर्थपंडित

जिरे हा जसा स्वयंपाकातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, त्याचे तितकेच महत्त्व कमोडीटी बाजारातही पाहायला मिळत आहे. जिर्‍याचा दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या फोडणीला महागाईची झळ बसली असली, तरी कमोडीटी बाजारात गेल्या तीन वर्षांत जिर्‍याची किमत जवळपास 150% वाढल्याने गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.

मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्याने उच्चांकी पातळीवर ट्रेंड करत आहे. कमोडीटी बाजारात तीन वर्षांपूर्वी जिरे 6,000 रुपयांच्या आसपास होते. सध्या जिर्‍याचा भाव 45,000 रुपयांच्या आसपास आहे. यंदा देशात 40 लाख पोती जिर्‍यांचे उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षी एक पोते 20 ते 25 हजार रुपयांना मिळत होते. यंदा हा भाव 50 ते 60 हजार रुपयांवर पोहचला होता. सध्या तो 45,000 रुपयांच्या आसपास आहे.

जिरे (Cuminum Cyminum) ही फूल वनस्पती आहे. झाडाची उंची 15 ते 50 सें.मी. असते. त्याचे फळ लांबलचक, अंडाकृती, 3-6 मिमी लांब असते. जिर्‍याची लागवड भारतात रब्बी हंगामात ऑक्टोबरच्या मध्यापासून डिसेंबरच्या मध्यापर्यंत केली जाते. जिरे पिकाला परिपक्तता येण्यासाठी 110-115 दिवस लागतात. कापणी फेब्रुवारीपासून सुरू होते. साधारणपणे मार्च महिन्यात बाजारात आवक होते. निचरा होणार्‍या वालुकामय चिकणमाती जमिनीवर जिरे पिकाचे चांगले उत्पादन होते. गुजरातमधील उंझा हे देशातील जिर्‍याचे प्रमुख व्यापारी केंद्र आहे. भारत हा जिरे पिकाचा प्रमुख उत्पादक, ग्राहक आणि निर्यातदार आहे. जिरा उत्पादनात तुर्कस्तान खालोखाल सीरिया दुसर्‍या क्रमांकावर आहे. आपल्या देशात गुजरात आणि राजस्थानमध्ये प्रामुख्याने जिरा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जिर्‍याच्या प्रमुख निर्यातदार देशांमध्ये भारत, तुर्की, सीरिया, इराण यांचा समावेश होतो. चीन आणि बांगला देश मोठे जिरे खरेदीदार देश म्हणून ओळखले जातात. (क्रमश:)

जिर्‍याचा उपयोग

भारतात स्वयंपाकात जिरे वापरले जाते. जिर्‍याला सुगंधी गंध आणि कडू चव असते. ब्रेड, केक आणि चीज, साल्सा, सूपमध्ये जिरा हा मसाला म्हणून वापरला जातो. अत्तरामध्येही जिर्‍याचा वापर केला जातो.

परिणाम करणारे घटक

  • जिरा उत्पादक भागात पेरणी आणि कापणी अवस्थेत हवामानाची स्थिती.
  • मसाल्यांवर प्रक्रिया करणारे उद्योग आणि आयातक देशाकडून जिरा बियाण्याची मागणी.
  • सरकारची आयात आणि निर्यात धोरणे.
  • आंतरराष्ट्रीय किमती.
  • मागील हंगामातील शिल्लक साठा.

Back to top button