अंगणवाडी कर्मचारी ४ डिसेंबर पासून राज्यव्यापी बेमुदत संपावर | पुढारी

अंगणवाडी कर्मचारी ४ डिसेंबर पासून राज्यव्यापी बेमुदत संपावर

कुडाळ; पुढारी वृत्तसेवा : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करणे व इतर मागण्या मान्य न झाल्यामुळे ४ डिसेंबर २०२३ पासुन अंगणवाडी कर्मचारी राज्यव्यापी बेमुदत संपावर जाणार आहेत. तसेच माहे नोव्हेंबर २०२३ या महिन्याचा मासिक अहवाल (एम.पी.आर.), मासिक बैठका व इतर माहिती देण्यावर अंगणवाडी कर्मचारी संपूर्ण बहिष्कार घालणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. या राज्यव्यापी बेमुदत संपाबाबतची कायदेशीर नोटीस महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृति समितीच्या वतीने राज्य शासनाला देण्यात आली आहे, अशी माहीती या समितीच्या वतीने कमलताई परुळेकर यांनी कुडाळ येथे दिली.

कृती समितीच्या पदाधिकारी कमलताई परुळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आम्ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृति समितीच्यावतीने या राज्यव्यापी संपाबाबत नोटीसीद्वारे राज्य सरकार व संबंधित मंत्र्यांना कळविले आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी भरीव मानधनवाढ, मासिक पेन्शन या व अन्य मागण्यांसाठी संप केला होता व तो केवळ ९ दिवसांत मिटला. त्यावेळेस अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनिसांना अनुक्रमे रु.१५००, १२५०, १००० मानधनवाढ ५ वर्षानंतर होत असल्यामुळे वाढत्या महागाईच्या मानाने फारच अल्प होती. परंतु अन्य मागण्याबाबत विचार करुन कृति समितीने ती मान्य केली. अंगणवाडी कर्मचारी तेव्हा अत्यंत निराश झाल्या व आजही त्या समाधानी नाहीत. अंगणवाडी कर्मचारी गेली ४८ वर्षे इमाने इतबारे कुपोषण निर्मुलनाचे काम करत आहेत. ४० वर्षे सातत्याने सरकार दरबारी लढा देवुन प्रचंड महागाईच्या काळात आता कुठे अंगणवाडी सेविका दहा हजार, मिनी अंगणवाडी सेविका साडेसात हजार व मदतनिस साडेपाच हजारापर्यंत पोहोचल्या आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे काम इतर विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामाप्रमाणेच महत्वाचे आहे. परंतु शासन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नेहमीच सावत्रपणाची वागणुक देत आले आहे. अशी भावना अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होत आहे. इतर विभागातील कर्मचाऱ्यांना भरघोस वाढ व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तुटपुंजी वाढ असा दुजाभाव का? असा प्रश्न त्यांना सतावत आहे, असे कमलताई परुळेकर यांनी म्हटले आहे.

या आहेत मागण्या….

महागाईच्या भष्मासुरात होरपळुन निघणाऱ्या महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अनेक न्याय मागण्या आहेत. यात सर्वोच्च न्यायालयाच्या CIVIL APPEAL NO. 3153 OF @ SLP (CIVIL) NO. 30193 of 2017 मधील २५ एप्रिल रोजी ग्रॅच्युईटीबाबत दिलेल्या अंतिम निकालाची अंमलबजाणी करावी. त्यात म्हटल्यानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पदे ही वैधानिक पदे असुन त्यांना मिळणारा मोबदला हा वेतनच आहे. तरी त्यानुसार त्यांना शासकीय कर्मचारी घोषीत करून त्या अनुषंगाने येणारी वेतनश्रेणी, ग्रॅच्युईटी, भविष्य निर्वाह निधी आदी सामाजिक सुरक्षा, इत्यादी सर्व लाभ देण्यात यावेत. अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविकांना दरमहा २६,००० रुपये व मदतनिसांना २०,००० रुपये दरमहा मानधन देण्यात यावे. मानधन वाढले तरी महागाई त्याच्या दुपटीने वाढल्यामुळे ते कमीच पडते. तरी महागाई निर्देशांकाला जोडुन दर सहा महिन्यांनी मानधनात महागाई निर्देशांकानुसार वाढ करावी. महिला व बालविकास मंत्र्यांशी चर्चा झाल्यानुसार विना योगदान मासिक निर्वाह भत्ता (पेन्शन) सेवा समाप्तीनंतर देण्याचा प्रस्ताव मंत्र्यांनी मान्य केल्याप्रमाणे नोव्हेंबर अखेरपर्यंत तयार करून तो हिवाळी अधिवेशनात मंजुर करवून घ्यावा. महानगरपालिका हद्दीत जागेचे निकष शिथील करून अंगणवाड्यासाठी रु. ५००० ते ८००० भाडे मंजुर करावे. आहाराचा ८ रुपये दर अत्यल्प असुन त्यामुळे कुपोषण निर्मलुन होण्याऐवजी उलट त्यात वाढ होत आहे. तरी हा दर सर्वसाधारण बालकांसाठी १६ व अतिकुपोषित बालकांसाठी २४ रुपये असा करावा, या प्रमुख मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आल्याची माहीती परूळकेर यांनी दिली.

हेही वाचा

Back to top button