पुणे : अंगणवाडी, आशा स्वयंसेविकांचा एल्गार | पुढारी

पुणे : अंगणवाडी, आशा स्वयंसेविकांचा एल्गार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका आणि अर्धवेळ स्त्री परिचारिकांनी विविध मागण्यांसाठी बुधवारी जिल्हा परिषदेच्या समोर जोरदार निदर्शने केली. शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा मिळावा, शासकीय वेतनश्रेणी आणि भत्ते लागू करावेत, अर्धवेळ स्त्री परिचर पदाचे नाव बदलण्यात यावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

निदर्शनकर्त्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने जिल्हा परिषदेसमोरील वाहतूक दुसर्‍या रस्त्याने वळविण्यात आली होती. आंदोलक महिलांनी मणिपूर येथील घटनेचादेखील तीव्र निषेध नोंदवला. अंगणवाडी कर्मचार्‍यांना ग्रॅच्युईटी देण्याबाबत न्यायालयाने निर्देश देऊनही त्याची अंमलबजावणी केली नसल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात एका आठवड्यात त्यावर निर्णय घेऊ, असे सांगण्यात आले, परंतु अंमलबजावणी झाली नाही.

अंगणवाडी कर्मचार्‍यांना पेमेंट ऑफ ग्रॅच्युईटी अ‍ॅक्टप्रमाणे ग्रॅच्युईटी देण्याची मागणी करण्यात आली. आशा स्वयंसेविकांना योजनेशी संबंधित 72 प्रकारची कामे दिली जातात; परंतु त्याचा मोबदला वेळेवर कधीच मिळत नसल्याची खंत महिलांनी व्यक्त केली. अर्धवेळ स्त्री परिचारिका संघटना, आशा गट प्रवर्तक संघटना, अंगणवाडी कर्मचारी संघटना यात सहभागी झाल्या होत्या. राज्य उपाध्यक्ष नीलेश दातखिळे, नयना वाळुंज, सीता मिसाळ, मंदा पडवळ, आशा गटप्रवर्तक जिल्हा सचिव शुभांगी जगताप आदी उपस्थित होते.

या आहेत प्रमुख मागण्या…

  • अर्धवेळ स्त्री परिचर असे पदनाम दिले गेले आहे. मात्र त्या अर्धवेळ काम करत नसून, पूर्णवेळ काम करत आहेत. म्हणून त्यांचे पदनाम स्त्री परिचर करावे.
  • स्त्री परिचर यांच्या मानधनात वाढ करावी.
  • रिक्त असलेल्या आशा, गतप्रवर्तकाच्या जागा भराव्यात.
  • गटप्रवर्तकाचा आरोग्यवर्धिनी कार्यक्रमात समावेश करून घ्यावा.
  • अंगणवाडी कर्मचार्‍यांना शासकीय दर्जा देण्यात यावा, निवृत्तिवेतन देण्यात यावे.
  • अंगणवाडी केंद्राच्या भाड्यात वाढ मिळावी.

Back to top button