Loksabha election : महायुतीचे पुण्यासाठी संकल्पपत्र जाहीर; हे आहेत ठळक मुद्दे | पुढारी

Loksabha election : महायुतीचे पुण्यासाठी संकल्पपत्र जाहीर; हे आहेत ठळक मुद्दे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : विचार पुण्याचा… दीर्घकालीन हिताचा, असे सांगत भाजप आणि महायुतीने पुणे शहरासाठी केलेल्या संकल्पपत्राचे प्रकाशन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. भविष्यातील पुण्याचा सुरक्षित आणि पर्यावरणपुरक विकासाचा संकल्प महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी केला. उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार आशिष देशमुख, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे, मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, आरपीआयचे शहराध्यक्ष संजय सोनावणे यांच्यासह विविध नेते यावेळी उपस्थित होते. मोहोळ म्हणाले, पायाभूत सुविधा विकसित करताना उद्योग आणि रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न केले जातील. शाश्वत विकासाचे धोरण राबविण्यात येईल. ‘पुणे नेक्स्ट’ या व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही पुणेकरांना त्यांच्या अपेक्षा मांडण्यासाठी आवाहन केले होते. यातून हजारो सूचना आल्या. त्यातील काही निवडक सूचनांचा ‘संकल्पपत्रा’मध्ये समावेश केला आहे.

पुणे शहराच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प आखण्यात आला आहे. पायाभुत विकास, पर्यावरण, वाहतुक, नवीन रस्ते अशा योजनांसाठी प्रयत्न करणार आहोत. सार्वजनिक वाहतूक सक्षम करताना पीएमपीच्या ताफ्यात इलेट्रीक बसची संख्या वाढविण्याबरोबरच मेट्रोच्या विस्तारासाठी प्रयत्न केले जातील.

-मुरलीधर मोहोळ, महायुतीचे उमेदवार.

पुणे शहराचे प्रश्न मोदी सरकारने सोडवले आहेत. मेट्रो, नदीसुधार प्रकल्प, चांदणी चौकातील पूल असे प्रकल्प राबविण्यात आले. पुण्यासाठी केंद्र सरकारने इलेट्रीकल बस दिल्या, जायका प्रकल्पासाठी अनुदान देण्यात आले आहे.

-चंद्रशेखर बावनकुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष

संकल्पपत्रातील ठळक मुद्दे

  • पुण्यातील सार्वजनिक वाहतूक सक्षम आणि वेगवान बनविणार.
  • नगर रस्ता, सातारा रस्ता, जुना मुंबई-पुणे रस्ता, सोलापूर रस्ता, शिवाजीनगर ते हिंजवडी, तसेच कोथरूड उपनगर या मार्गांवर विस्तारित मेट्रो मार्गांची आखणी.
  • दौंड-पुणे-तळेगाव-लोणावळा ईएमयू, पुणे-दौंड लोकल सेवा.
  • नाशिक-पुणे मार्गासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा
  • लोहगाव, पुणे विमानतळाच्या धावपट्टीची लांबी वाढविणार.
  • ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’मार्फत येरवडा ते शिक्रापूरदरम्यान सहा पदरी उड्डाणपूल उभारणार
  • समान पाणीपुरवठा योजनेचे काम वेगाने पूर्ण करणार.
  • नवे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविणार.
  • पुण्याभोवतालच्या टेकड्या, वनक्षेत्राचे कसोशीने संरक्षण करणार.
  • सौरऊर्जा वापराला प्रोत्साहन.
  • ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था’ (एम्स) पुण्यात उभारण्याच्या राज्य सरकारच्या घोषणेनुसार पूर्ततेसाठी पाठपुरावा करणार.
  • ‘झोपडपट्टी पुनर्वसन योजने’अंतर्गत झोपडपट्टीधारकांना सदनिका देणार.
  • विविध कंपन्यांच्या ‘सीएसआर’ निधीतून तरुणांसाठी स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम राबविणार.
  • विद्यार्थी व शिक्षण संस्थांना पुणे परिसरातील कंपन्या हॉस्पिटल, आयटी सेक्टरसह अन्य उद्योगांशी जोडणार.
  • संगमवाडी येथील आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या समाधीस्थळाच्या कामाला गती देणार.
  • महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केलेल्या भिडे वाड्याचे स्मारक होण्यासाठी पाठपुरावा.
  • पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट पुणे महापालिकेत विलीन करण्याच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करणार.

हेही वाचा

Back to top button